CrimeNewsUpdate : थेट केंद्रीय मंत्र्यालाच सेक्सटोर्शन कॉल, दोघांना अटक

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांना सेक्सटोर्शन कॉल करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना राजस्थानमधील भरतपूर येथून पकडले. मोहंमद वकील आणि मोहंमद साहिब अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील रॅकेटचा सूत्रधार मोहंमद साबीर याचा पोलिस शोध घेत आहेत.
मंत्र्यांच्या स्वीय सचिवांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून मोबाइल फोनही जप्त केला आहे, ज्यावरून व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. हा फोन एफएसएलकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय मंत्र्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला होता. त्याने कॉल उचलताच दुसऱ्या बाजूने आक्षेपार्ह क्लिप वाजवण्यात आली. यानंतर त्याने कॉल डिस्कनेक्ट केला. आरोपींनी त्यांना फोन करून व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती.