CongressNewsUpdate : काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता ठरेना, आज बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवाय विरोधीपक्षनेते असलेले अजित पवार सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री झाले. तसेच ते ३० हून अधिक आमदार सोबत घेऊन गेले. त्यामुळे विधानसभेत आता काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहिला आहे. त्यामुळे काँग्रेसचाच विरोधीपक्षनेता होणार हे स्पष्ट आहे. मात्र अधिवेशन संपत आलं तरी काँग्रेसचा विरोधीपक्षनेता ठरला नाही. मात्र आज विरोधीपक्ष नेत्याबाबत काँग्रेसने बैठक आयोजित केली आहे.
विरोधी पक्षनेता ठरविण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आज संध्याकाळी बैठकीत विरोधीपक्षनेत्याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतरच दिल्लीला याबाबत कळवण्यात येणार आहे.
काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी दुसऱ्या फळीतील नेते उत्सुक आहे. विजय वडेट्टीवार, संग्राम थोपटे, सुनील केदार आणि यशोमती ठाकूर विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीत आहे. आज संध्याकाळच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यात दुसरीकडे मुसळधार पावसामुळे अधिवेशन लवकर संपविण्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत सातत्याने पाऊस होत असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.