Manipur Violence Update : मणिपूर दंगल प्रकरणी पिनराई विजयन यांची आरएसएस आणि केंद्रावर घणाघाती टीका…

- नवी दिल्ली : गेल्या अडीच तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये दंगल उसळली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 150 जणांचा बळी गेला असून करोडो रुपयांची मालमत्ता आगीत फस्त झाली आहे. परंतु महिलांवरील अत्याचारामुळे देशभर या दंगलीची निंदा करण्यात येत आहे. तर राज्य सरकारचे दंगल शमविण्यासाठी अपुरे अडत चाललेले प्रयत्न आणि केंद्र सरकारचे मौन यावरून मोठी टीका होत आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत, त्यातील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेचे देशभर संतप्त पडसाद उमटले आहेत. यावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपली प्रतिक्रिया देताना मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर टीका केली आहे.
तिरुवनंतपुरम येथे जारी केलेल्या निवेदनात विजयन यांनी म्हटले आहे की,”देशातील धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही समाजाने हे लक्षात घेतले पाहिजे की, संघ परिवाराच्या (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) अजेंड्यामुळे मणिपूरचे दंगलग्रस्त भूमीत रुपांतर झाले आहे. संघ परिवाराकडून तिथे द्वेषाची पेरणी केली जात आहे. दंगलीच्या नावाखाली मणिपूरमध्ये ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य केले जात आहे. ख्रिश्चन आदिवासी समुदायाच्या चर्चवर हल्ले केले जात आहेत.”
पिनराई विजयन यांनी पुढे म्हटले आहे की, “मणिपूरमधून दररोज नवनवीन धक्कादायक घटना समोर येत आहेत. मानवी सदसद्विवेक बुद्धीला लाजवणारे अत्यंत भयानक दृश्य मणिपूरमधून वारंवार समोर येत आहे. हिंसाचाराच्या सुरुवातीच्या दिवसांचे काही दृश्य आता समोर येत आहेत. कुकी समुदायातील महिलांना हिंसक जमावाने अत्यंत घृणास्पद आणि क्रूर पद्धतीने वागणूक दिली आहे.”
त्यांनी असाही आरोप केला आहे की, “मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे लोक कर्तव्य बजावत आहेत, तेच लोक हिंसाचाराला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचे मौन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आता उघडा पडत आहे. जातीय ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना पराभूत करणे, ही लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची जबाबदारी आहे.”