ManipurViolenceNewsUpdate : मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढल्याच्या मुद्द्यावर अमेरिका काय म्हणाली?

न्यूयॉर्क : गेल्या तीन महिन्यापासून ईशान्येकडील मणिपूर राज्य हिंसाचाराच्या वणव्यात होरपळत आहे. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची रस्त्यावर धिंड काढण्यात आली. मणिपूरमधील महिलांच्या या लैंगिक छळावर अमेरिकेने भाष्य केले आहे. यापूर्वीही मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर अमेरिकेने भाष्य केले होते.
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराच्या दरम्यान महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या व्हायरल व्हिडिओवर टिप्पणी करताना, भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी म्हणाले की मणिपूरमध्ये सुरू असलेली हिंसा ही भारताची अंतर्गत बाब आहे. पण जेव्हाही मी कुठेतरी असा हिंसाचार पाहतो तेव्हा माझे हृदय दुखते. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे आयोजित एका कार्यक्रमात गार्सेट्टी यांनी हे भाष्य केले.
मणिपूरमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील एका गावात कुकी-जोमी समुदायातील दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावारून त्यांची धिंड काढली जात आहे. मणिपूर पोलिसांच्या माहितीनुसार हा व्हिडिओ ४ मेचा असून देशात यावरून प्रातिक्रियांचा आगडोंब उसळल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी हे सध्या वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करण्यासाठी आहेत. दरम्यान, मणिपूरमध्ये दोन महिलांवर झालेल्या क्रूरतेशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला.तेंव्हा यावर उत्तर देताना ते म्हणाले की , “मी अद्याप व्हिडिओ पाहिला नाही. मी पहिल्यांदाच याबद्दल ऐकत आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार ही भारताची अंतर्गत बाब आहे. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा जेव्हा अशी घटना घडते तेव्हा मनाला अतीव दुःख होते आणि आपले हृदय तुटते. मग ती घटना आपल्या शेजारी घडलेली असो वा जगभरात. किंवा आपण जिथे राहतो त्या देशात.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अमेरिकेचे राजदूत पुढे म्हणाले, “आमचे विचार भारतीय लोकांसोबत आहेत. माणूस म्हणून, अशा वेदना आणि दुःखांबद्दल आम्ही नेहमीच सहानुभूती बाळगतो.”
यापूर्वी ६ जुलै रोजी कोलकाता येथील अमेरिकन सेंटरमध्ये पत्रकार परिषदेत गार्सेटी यांनी ही मानवतावादी समस्या असल्याचे म्हटले होते आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत देऊ केली होती. ते म्हणाले होते, “मणिपूरमधील हिंसाचार ही मानवतावादी समस्या आहे. आम्ही तेथे शांततेसाठी प्रार्थना करतो. आम्हाला माहित आहे की ही भारताची अंतर्गत बाब आहे. पण आम्हाला विचारले तर आम्ही कोणत्याही प्रकारे मदत करण्यास तयार आहोत.”
युरोपीयन संसदेतही कडाडून टीका पण अमेरिकेने म्हटले अंतर्गत बाब
मणिपूर हिंसाचारावर मोदी सरकारवर थेट टीका करणे अमेरिका टाळत आहे. तथापि, मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत युरोपियन युनियनच्या ब्रसेल्सस्थित संसदेने गेल्या आठवड्यात एक ठराव मांडला होता, तो भारत सरकारने फेटाळला होता. युरोपीयन संसदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावात मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करून, ठरावाने युरोपियन युनियनच्या उच्च अधिकाऱ्यांना परिस्थिती सुधारण्यासाठी भारत सरकारशी बोलण्याचे निर्देश दिले. मात्र भारताने हा प्रस्ताव साफ फेटाळला. मणिपूरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे भारत सरकारने म्हटले होते. भारताने मणिपूर हिंसाचाराबाबत भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्यावर युरोपीय संसदेत या प्रस्तावावर चर्चा होत असल्याचे भारताने म्हटले आहे.
१६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला…
मणिपूरमध्ये ३ मे रोजी वांशिक हिंसाचार सुरू झाल्यापासून १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. कुकी समुदायाने पहाडी जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढला आणि अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समावेश करण्याच्या मेतेई समुदायाच्या मागणीला विरोध केला तेव्हा हिंसाचार सुरू झाला. मणिपूरची लोकसंख्या मेईतेई समुदायाच्या सुमारे ५३ टक्के आहे. ते मुख्यतः इम्फाळ खोऱ्यात राहतात, तर कुकी आणि नागा आदिवासी ४० टक्के असून बहुतेक आदिवासी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.