Manipur Violence Update : महिलांवर अत्याचार करणाऱ्या कथीत आरोपींच्या घराची जामावाने केली होळी …

इंफाळ : गेल्या तीन महिन्यांपासून हिंसक आंदोलनामुळे जळत असलेल्या मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. त्यातच दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तणाव वाढला असून, महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचं घर जमावाने जाळून टाकलं आहे. हि घटना मणिपूरमधील चेकमाई परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अचानक आलेल्या जमावाने मुख्य आरोपीचं घर पेटवून दिलं. या घटनेचा व्हिडीओसुद्धा आता व्हायरल होत आहे. मणिपूरमध्ये आरक्षणावरून हिंसेचा आगडोंब भडकल्यानंतर दोन महिलांना जमावाने नग्न करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील मुख्य आरोपीला गुरुवारी अटक केली होती.
मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा जो भीषण प्रकार ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील गावामध्ये घडला, त्याची पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरमधील माहिती अंगावर काटा आणणारी आहे. अत्याधुनिक शस्त्रे घेतलेले ८०० ते १००० लोक बी फिनोम या गावामध्ये घुसले. या लोकांपासून जीव वाचविण्यासाठी गावकरी जंगलात आश्रयाला गेले.त्यापैकी पाच जणांना मैतेई संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यात ५६ वर्षे वयाची एक व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षे वयाची मुलगी तसेच ४२ वर्षे व ५२ वर्षे वयाच्या दोन महिलांचा समावेश होता. त्यातील ५६ वर्षांच्या व्यक्तीची मैतेई जमावाने हत्या केली. त्यानंतर तीन महिलांना सर्व लोकांसमोर विवस्त्र केले. त्यानंतर २१ वर्षे वयाच्या मुलीवर दिवसाढवळ्या सर्वांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच दोन महिलांचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मणिपूरमध्ये अशा अनेक घटना …
दरम्यान, मणिपूरच्या १० आमदारांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. आणखी ५ महिलांसोबत अशा घटना घडल्याचा दावा या आमदारांनी निवेदनाद्वारे केला आहे. यातील तीन महिला अशा आहेत, ज्यांच्यावर बलात्कार झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात या घटना घडल्या आहेत. आमदारांच्या या दाव्यांवर कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने भाष्य केलेले नाही. या प्रकरणांचा तपास सीबीआयमार्फत करावा, अशी मागणी आमदारांनी सरकारकडे केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा संताप उसळला आहे. या घटनेतील मुख्य आरोपीच्या घराला शुक्रवारी आग लावली. सरकारने राज्यात इंटरनेटवर बंदी घातली आहे, केंद्र सरकारने कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा व्हिडीओ शेअर करण्यावर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनीही अशा घटना मणिपूरमध्ये शेकडो असल्याचे इंडिया टुडेच्या वार्ताहरांशी बोलताना म्हटले आहे.