MaharashtraRainUpdate : राज्यात आणखी तीन दिवस कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस…

मुंबई : राज्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. मुंबईत गेल्या चार दिवसापासून सुरु असलेला पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज माढ्या आणि पश्चिम महारष्ट्रासह कोकण विभागात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
यावर्षी उशिरा म्हणजे जून महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. त्यानुसार मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. कोकणात 30 जून ते 3 जुलैपर्यंत पावसाचा इशारा दिला असून या ठिकाणी यलो अलर्टही जारी केला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यानऔरंगाबादमध्ये गुरुवारी पावसाच्या सरी कोसळल्या. शहरातील अनेक ठिकाणी नदी नाले वाहत होते. आज देखील शहरामध्ये पाऊस असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत ९० टक्के पाऊस
मुंबईत पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी गेल्या काही दिवसांत पाऊस जोरदार कोसळत आहे. गुरुवारी सहा तासांत 74 मिमी पावसाची नोंद झाली. गत 3 ते 4 दिवसांपासून शहरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत असून येत्या काही दिवसांतही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. आता पर्यंत मुंबईत ९० टक्के पाऊस झाला आहे. कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. गुरुवारी मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 24 तासांत शहरात 135 मिमीहून अधिक पाऊस झाला. तर ठाणे शहरात 143.9 इतकी पावसाची नोंद झाली आहे. आज पुन्हा ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस झाला. लोणावळ्यात 87 तर लवासात 62 मिमी पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शेतीकामांना वेग आला आहे.
गुरुवारी कोल्हापूर शहर परिसरात पावसाची संततधार सुरू राहिली. राधानगरी धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे. लक्ष्मी तलावात असणाऱ्या बेनजर व्हिला या वास्तूकडे जाणारा मार्ग आता बंद झाला आहे. आज (30 जून) रोजी पावसाचा अंदाज असून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तर पन्हाळा तालुक्यातील नेबापूर नजीक विजेची तार तुटून आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.