AIRNewsUpdate : पुणे आकाशवाणीच्या बातम्या छत्रपती संभाजीनगरवरून देण्याच्या निर्णयाला स्थगिती

पुणे : आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा निर्णयाला माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली असल्याचे वृत्त आहे यावरून मोठी चर्चा सुरू झाली होती. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि १९ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार होती. मात्र, या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर व्यक्त झाल्यानंतर सरकारला निर्णय स्थगित करून एक पाऊल मागे यावे लागले आहे.
राज्यसभा खासदार आणि माजी माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली. पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे केंद्र छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय रद्द करावा, या संदर्भात जावडेकर यांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जावडेकर सध्या तेलंगणा दौऱ्यावर असून त्यांनी या विषयासंदर्भात अनुराग ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.