Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MonsoonNewsUpdate : जाणून घ्या काय आहे पावसाची बातमी …, बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग मंदावला

Spread the love

नवी दिल्ली : देशात मान्सूनचे आगमन झाले असले तरी पुढील चार आठवड्यात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ या खासगी संस्थेने वर्तवला. यामुळे शेतीवरील परिणामाबाबतही चिंता वाढली आहे. ‘एक्सटेण्डेड रेंज प्रेडिक्शन सिस्टीम (ईआरपीएस) आगामी चार आठवडे म्हणजेच ६ जुलैपर्यंत पाऊस येईल असा अंदाज वर्तवत आला आहे. परिणामी कृषिप्रधान क्षेत्र कोरडे राहण्याचे अनुमान स्कायमेटने सोमवारी नमूद केले केले आहे.

दरम्यान अपुऱ्या पावसामुळे , जास्त प्रमाणात पाऊस पडणाऱ्या भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात कोरड्या दुष्काळाच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे. ‘अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने पहिल्यांदा केरळमधील पावसाचे आगमन लांबवले आणि आता पर्जन्य प्रणालीच्या प्रगतीत यामुळे अडथळा येत आहे. त्यामुळे द्वीपकल्पाच्या अंतर्गत क्षेत्रात मान्सून पोहोचण्यात अटकाव करत आहे,’ असे या संस्थेने अधोरेखित केले.

आणखी चार आठवडे तुरळक पाऊस

मान्सून साधारणपणे १५ जूनपर्यंत महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणाचा अर्धा भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहार ही क्षेत्रे व्यापतो परंतु, मान्सूनचा प्रवाह अजूनही या भागांवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. सद्यस्थितीत मान्सून ईशान्य आणि पश्चिम किनारपट्टीपर्यंत मर्यादित आहे. आगामी काळात बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली उदयास येण्याची चिन्हे नाहीत. स्कायमेट संस्थेच्या अंदाजानुसार आणखी चार आठवडे तुरळक पाऊस पडू शकतो.

मान्सून तुरळक राहिल्यास शेतीला फटका

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील खरिपातील शेतीचे गणित हे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. साधारणपणे ७ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो आणि त्यानंतर १५ जूनपर्यंत राज्यभर पोहोचतो.यादरम्यान शेतकरी शेतीची कामे करत असतात. यंदा मात्र, चार आठवडे तुरळक पाऊस राहिल्यास शेतीवर विपरित परिणाम होऊ शकतो.

दरम्यान मुंबईत मंगळवारी सायंकाळी हलक्या पावसाने उपस्थिती लावली. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या शनिवारपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तसेच दक्षिण कोकणातही हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे. त्यामुळे कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतरही कोकण विभागात सरींची तीव्रता वाढलेली नसल्याने चिंता आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग मंदावला

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग मंदावला आहे.  गुजरातसह महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. येथील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. हे चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे पुढे सरकत आहे. येत्या २४ तासांत हे चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तानच्या कराची दरम्यान आदळण्याची शक्यता आहे. गुजरातच्या कच्छ आणि मांडवी भागात याचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या महासंचालकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बिपरजॉय वादळ सध्या ईशान्य अरबी समुद्रातील जाखाऊ बंदरापासून २८० किमी दूर आहे. गेल्या २४ तासांत वादळाचा वेग मंदावला असून तो जवळपास स्थिर आहे. गेल्या तीनपासून त्यात फारशी हालचाल नाही.

मुंबईचा धोका टळला

बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईला असलेला संभाव्य धोका टळला आहे. हे चक्रीवादळ मुंबईला समांतर राहात गुजरातच्या दिशेनं पुढे सरकलं आहे. त्यामुळं गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्रासह ८ जिल्ह्यांना चक्रीवादळामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराचीदरम्यान जमिनीवर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!