AurangabadAccidentNewsUpdate : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, चिमुकला ठार , ५ गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर मुंबई येथून बिहारमधील छाप्राकडे निघालेल्या कारला समृद्धी महामार्गावर वैजापुरजवळ जांबरगाव ते लासुरगावदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी येवला येथे हलवण्यात आले आहे. अख्तर रझा (वय १ वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. विशेष म्हणजे हज यात्रेला जायचे असल्याने हे कुटुंब गावाकडे जात होते.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूळचे छाप्रा (बिहार) मधील छाप्रा येथील असलेले खान कुटुंब सध्या वाशी, नवी मुंबई येथे स्थायिक झालेले आहे. तर गया येथून १७ जून रोजी ते विमानाने हज यात्रेसाठी जाणार होते, त्यासाठी ते आपल्या गावी छात्रा येथे जात होते. समृद्धी महामार्गावरुन जात असताना जांबरगाव व लासूरगाव दरम्यान शनिवारी दपारी दोन वाजेच्या समारास चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कॉरिडॉरजवळच्या उलटली. दुभाजकामध्ये गाडीचे टायर फुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे.
या अपघातात गाडी चक्काचूर झाली असून, यात एक वर्षाचा अख्तर रझा हा चिमुकला जागीच गतप्राण झाला. तर कुटुंबातील आझाद अली खान (वय ४९ वर्षे), अफताब अली (वय २४ वर्षे), खुशबू आलम खान (वय २६ वर्षे) यास्मिन खान (वय १८ वर्षे), सोहेल आलम खान (वय ३० वर्षे) हे गंभीर जखमी झाले. तर जखमींना नागरिकांनी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी येवला येथे हलवले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.