IndiaNewsUpdate : न्यायालयाच्या निर्णयाची प्रत आता हिंदीसह सर्व प्रादेशिक भाषांमध्ये , पंतप्रधानांकडून कौतुक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी हिंदीसह देशातील इतर भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या प्रती उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही खूप चांगली कल्पना आहे, ज्यामुळे अनेकांना, विशेषतः तरुणांना मदत होईल.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, लवकरच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या प्रती हिंदी आणि देशातील इतर भाषांमध्ये उपलब्ध होतील. महाराष्ट्र आणि गोवा परिषदेच्या (बीसीएमजी) कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी चंद्रचूड शनिवारी (२२ जानेवारी) मुंबईत आले होते. येथेच त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे न्यायालयाच्या निर्णयांचे इतर भाषांमध्ये भाषांतर करण्याचे संकेत दिले. डीवाय चंद्रचूड म्हणाले होते की, यामुळे खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या भाषेत निर्णयांची माहिती सहज मिळू शकेल. यापूर्वी न्यायालय पेपरलेस असावे, हे माझे ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान चंद्रचूड यांच्या या भूमिकेचे कौतुक करण्याबरोबरच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतकाळातील न्यायालयीन निर्णयसुद्धा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून सामान्यांसाठी अधिक सुलभ करण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी मुख्य न्यायाधीशांच्या भाषणाची क्लिपही ट्विट केली आणि शेअर केली.
न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण…
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रसारण करण्याचा आग्रह धरला आहे. ते म्हणाले की कायद्याची आवड असलेले शिक्षक आणि विद्यार्थी लाइव्ह-स्ट्रीमिंगद्वारे कोणतेही प्रकरण पाहू शकतात, समजू शकतात आणि चर्चा करू शकतात. ते म्हणाले की, एखाद्या मुद्द्यावर थेट चर्चा केली की समाजात किती अन्याय होत आहे, हे कळते.डीवाय चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश आहेत. देशातील शेवटच्या माणसाला स्वस्त आणि जलद न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरन्यायाधीशांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची प्रत हिंदीसह देशातील इतर भाषांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा आज केली. या घोषणेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.