NashikNewsUpdate : टायर फुटून झालेल्या अपघातात ५ ठार

नाशिक: नाशिक-पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी सिन्नरजवळील मोहदरी घाटात तीन वाहनांच्या विचित्र अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अन्य चार जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन विद्यार्थिनींसह दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नाशिक येथील के.टी.एच.एम. महाविद्यालयातील हे सर्वजण असल्याची प्राथमिक माहिती आहे. या वाहनातील काही विद्यार्थ्यांनी मद्यपान केल्याचा पोलिसांना संशय आहे.
गुरूवारी नाशिक-सिन्नर महामार्गावर शिंदे (पळसे) येथे राज्य परिवहनच्या दोन बस, तीन मोटारसायकल आणि मोटार यांच्या अपघातात एक बस पेटून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. याच मार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. के.टी.एच.एम. महाविद्यालयातील विद्यार्थी एका विवाह सोहळ्यासाठी निळ्या रंगाच्या स्विफ्ट मोटारीतून दुसऱ्या गावी गेले होते. नाशिककडे परतत असताना मोहदरी घाटात भरधाव मोटार अनियंत्रित होऊन थेट दुभाजक तोडून दुसऱ्या मार्गिकेत जाऊन उलटली. त्या मार्गावरील पांढऱ्या रंगाची स्विफ्ट आणि इनोव्हाला ती धडकली. या अपघातात निळ्या स्विफ्टमधील पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले. तसेच अन्य वाहनातील एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची भीषणता इतकी होती की जवळपास कारमधील ८ पैकी पाच जणांचा जागेवर मृत्यू झाला. मयतांमध्ये ३ मुली आणि २ मुले समावेश आहे. यामध्ये हर्ष दीपक बोडके, सायली अशोक पाटील, मयुरी पाटील, प्रतीक्षा घुले, शुभम ताडगे अशी मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी १७ ते १९ वयोगटातील आहेत. त्यातील काही नाशिकच्या सिडकोतील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.