ShivsenaNewsUpdate : उद्धव ठाकरे औरंगाबादेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर , हातात आसूड घेण्याचे आवाहन …

औरंगाबाद : राज्यातील सत्तांतरानंतर आणि औरंगाबादमधील शिवसेनेचे तब्बल पाच आमदार शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ऐन दिवाळीत औरंगाबाद जिल्हातील विविध गावांमध्ये शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पेंढापूरमधून शेताच्या बांधावर पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली. हे सरकार भावना नसलेले , उत्सवी सरकार आहे, उत्सव साजरे करताना राज्यातील प्रजा दु:खात आहे हे देखील ते पाहत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
महाविकास आघाडीच्या काळात दोन ते अडीच वर्ष करोनात गेली. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी राबला नसता तर दिवाळे निघाले असते. ते पुढे म्हणाले की , आज एकूणच घोषणांची अतिवृष्टी सुरु आहे. या निर्दयी सरकारकडे भावना नाहीत. हे सरकार बेदरकारपणे सांगत आहे की , ओला दुष्काळ जाहीर करण्याची स्थिती नाही. शेतकरी संकटात असताना मी इथे आलो कारण शेतकऱ्यांच्या नुकसानाची स्थिती राज्यातील आणि देशातील जनतेला कळूदेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पत्रकारांनी मी काय बोलतो हे दाखवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारला दाखवाव्यात.
आसूडाच्या माध्यमातून सरकारला घाम फोडा
शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणले कि, संकट येत असतात त्या काळात सरकारला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसला तरी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्ष तुमच्या पाठिशी आहोत. शेतकरी म्हणून एक व्हा, शेतकऱ्यांनी आसूड वापरायला हवा, आसूड तुमच्या हातामध्येच शोभून दिसतो. शेतकऱ्यांनी आसूडाच्या माध्यमातून सरकारला घाम फोडला पाहिजे. यामध्ये शिवसेना तुमच्या सोबत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्याशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली मात्र बळीराजाशी गद्दारी करु नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही सातत्याने एनडीआरएफसंदर्भात चर्चा केली होती. मी आमच्या घरी आणि पंतप्रधान त्यांच्या घरी होते. घरी बसूनच आम्ही काम केले. एनडीआरएफचे निकष जुने झाले होते. त्यामध्ये सुधारणा व्हावी, अशी मागणी केली होती. स्वत: चे घर सोडून फिरणाऱ्यांनी माझ्यावर टीका करु नये, असे प्रत्युत्तरही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले . ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. पाऊस पडत नाही त्याला कोरडा दुष्काळ म्हणतो. अतिवृष्टी होते त्याकाळात पीक नासून जाते . सोयाबीन, कापूस, मका नासून जात आहे. मला जिथे शक्य होईल तिथे मी जाणार आहे. मी शेतकऱ्यांचा माणूस म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. शेतकऱ्यावर जे संकट आलं आहे त्याला वाचा फोडा, असे उद्धव ठाकरे पत्रकारांना उद्देशून म्हणाले.