NagpurNewsUpdate : धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी सजली दीक्षाभूमी , लाखो अनुयायांची गर्दी …

नागपूर : गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या सावटामुळे राज्यात कुठलेही मोठे उत्सव होऊ शकले नव्हते. नागूपरतील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर दरवर्षी बौद्ध अनुयायांच्यावतीने धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्ताने देशभरातून लाखो नागरिक नागपुरात एकत्र येऊन बुद्ध आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून लाखो लोक नागपुरात दाखल होत आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या समतानिष्ठ विचारांनी प्रेरित होऊन १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात हिंदू धर्माचा त्याग करून आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला होता. तसेच या धम्मदीक्षेच्या दरम्यान त्यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांमुळे देशात मोठी धम्म क्रांती केली होती. सम्राट अशोकानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या या धम्म दीक्षा सोहळ्याला महत्व आहे. या निमित्ताने डॉ . बाबासाहेबांनी या देशात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले म्हणून या सोहळ्याला मोठे महत्व आहे.
सर्वत्र धम्म ध्वज आणि स्वागताचे फलक
या निमित्ताने संपूर्ण नागपूर शहरात सर्व मुख्य रस्त्यावर स्वागताचे फलक आणि धम्म ध्वज लावण्यात आले आहेत तर दीक्षाभूमीवर सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी महानगर पालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरातील कायमस्वरूपी नळांना चोवीस तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. आवश्यकतेनुसार स्टँडपोस्ट, टँकर व पीव्हीसी टँक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महापालिकेची विशेष तयारी
दरम्यान ५ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे या दरम्यान महापालिकेतर्फे साफसफाईसाठी प्रत्येक शिफ्टला ३०० सफाई कामगारांची २४ तास व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच अस्थायी स्वरूपाची शौचालय व स्नानगृहे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महाराष्ट राज्य वीज वितरण कंपनी व महानगर पालिका यांच्या समन्वयातून आवश्यक प्रकाश व्यवस्था करण्याचे कार्यही सुरू आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्थाही करण्यात येणार आहेत.
तात्पुरत्या आरोग्य केंद्रांची स्थापना…
या शिवाय दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या आरोग्याची जबाबदारी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विविध वैद्यकीय संघटनांनी घेतली आहे. माता कचेरी परिसरात (हेल्थ झोन) तात्पुरते आरोग्य केंद्र स्थापन केले जाणार आहे. महानगर पालिका, आरोग्य उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समन्वयाने हे झोन काम करेल. मेडिकल, मेयो व खासगी इस्पितळांमध्ये वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
हजारो मैलावरून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी हजारावर संघटना सरसावल्या आहेत. पाण्यापासून ते चहा-नाश्ता व दोन वेळच्या जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. काही सामाजिक व वैद्यकीय संघटनांनी वैद्यकीय सेवेसोबतच नि:शुल्क औषधी उपलब्ध करून दिल्या.
हजारो नागरिकांनी घेतली धम्म दीक्षा …
६६वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरेई ससाई व त्यांच्या भिक्खू संघाने पहिल्याच दिवशी ७ हजारांवर अनुयायांना धम्मदीक्षा दिली.
भदंत ससाई यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर तीन दिवस धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भिक्खू संघाचे भदंत धम्मसारथी, भदंत नागवंश, भदंत नागसेन, भदंत प्रज्ञा बोधी, भदंत धम्म विजय, भदंत महानाग, भदंत धम्मप्रकाश, भदंत मिलिंद, भदंत धम्मबोधी, भदंत नागाप्रकाश, भदंत महाकश्यप आदींच्या उपस्थित हा सोहळा पार पडत आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
दीक्षाभूमीवरील सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडावेत म्हणून २५०० पोलीस जवान तैनात करण्यात आले आहे. १०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. पोलिसांची ५ मोबाईल सर्विलन्स व्हॅनद्वारे पाळत ठेवली जाणार आहे. चोरी, महिला श्रद्धाळूंशी छेडखानी करणाऱ्यांवर विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी हेल्प डेस्क बनविले आहे. स्मारक समितीतर्फे समता सैनिक दलाचे २ हजार स्वयंसेवक तैणात करण्यात आले आहे. दीक्षाभूमीवर तैनात अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोमवारीच बंदोबस्ताचे नियोजन सांगण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना पोलीस प्रशासनाची मदत करण्याचे आवाहन केले आहे. काही समस्या उदभवल्यास पोलिसांच्या हेल्प डेस्कला तसेच टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
नागपुरात विविध कार्यक्रम
दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनासह , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, रावण दहन आणि दुर्गा मंडळांचे विसर्जन या सर्व कार्यालयात जमणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा ठेवली आहे. ६५०० कर्मचारी, तसेच अधिकारी या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलिसांना हाय-अलर्ट मोडवर ठेवले आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बंदोबस्तासंदर्भात माहिती देताना सांगितले की, बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन समारंभ, रेशीमबाग मैदानावर संघाचा विजयादशमी महोत्सव व दोन मोठे पथसंचालन होणार आहे. २९ ठिकाणी रावण दहन, ३३ मोठ्या दुर्गा मूर्तीचे विसर्जन होणार आहे. दीक्षाभूमीवर लोकांची होणारी गर्दी होणार आहे. पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाने या परिस्थितीचे अवलोकन करून पोलीसांना अलर्ट राहण्याचा सल्ला दिला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनीही कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त व अधिकाऱ्यांनी रविवारी सर्व महत्त्वाच्या ठिकाणचे निरीक्षण करून सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा केली. शहरात पाच हजार पोलीस जवान, एक हजार होमगार्ड, ५०० प्रशिक्षणार्थी जवान, एसआरपीच्या चार कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बाहेरील युनिट मधून तीन डीसीपी व ८ एसीपींना बोलाविण्यात आले आहे. दीक्षाभूमीच्या सुरक्षेला अतिशय गंभीरतेने पोलिसांनी घेतले आहे. काही संघटनांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहे. त्यानुसार विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.