IndiaNewsUpdate : मुस्लिम बुद्धिवादी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यात बंद खोलीत काय झाली “चर्चा ” ?

नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील काही विचारवंतांनी गेल्या महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली होती. यादरम्यान हिंदू-मुस्लिम यांच्यात सलोख्यासाठी काम करण्याचे मान्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात आरएसएसने मुस्लिमांशी संपर्क वाढवला आहे. या मुस्लिम विचारवंतांमध्ये माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी आणि दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग यांचा समावेश होता.
एनडीटीव्हीशी संवाद साधताना कुरेशी यांनी सांगितले की, २२ ऑगस्ट रोजी आरएसएस प्रमुख भागवत यांनी मुस्लिम विचारवंतांची भेट घेतली. यादरम्यान नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर चर्चा झाली. याशिवाय बनारसच्या ज्ञानवापी मशिदीबाबतही चर्चा झाली.
या बैठकीसाठी मुस्लिम विचारवंतांनी वेळ मागितल्याचे कुरेशी यांनी सांगितले. संभाषणादरम्यान एकीकडे भागवत यांनी गोहत्येवर आणि हिंदूंना काफिर म्हटले जाते याबद्दल आक्षेप घेतला होता तर दुसरीकडे मुस्लिम विचारवंतांनी प्रत्येक मुस्लिमाकडे संशयाच्या नजरेने पहिले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा न्यायालयात गाजत असताना ही बैठक झाली आहे. बैठकीत देशात जातीय सलोखा मजबूत करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उदासी आश्रम येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तात्पुरत्या कार्यालयात मोहन यांच्यावर बंद खोलीत चर्चा करणाऱ्या मुस्लिम विचारवंतांमध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जमिरुद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि समाजसेवी सईद शेरवानी यांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी दिल्लीत भागवत यांची भेट घेतली. दोन तास चाललेल्या या बैठकीत जातीय सलोखा मजबूत करणे आणि आंतर-समुदाय संबंध सुधारण्यावर व्यापक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.