InformationUpdate : आज ११ वाजता एक मिनिटांसाठी महाराष्ट्र होईल “सावधान” !!

मुंबई : केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सवच्या धर्तीवर राज्य सरकारने उद्या संपूर्ण राज्यभरात सामूहिक राष्ट्रगीत गायनच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने तसा अध्यादेश काढला आहे. त्यानुसार सकाळी ११:०० ते ११:०१ या कालावधीत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात नागरिकांनी नेमके कोणते नियम पाळायचे आहेत, याबद्दल सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत.
राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.