IndiaNewsUpdate : पुढील २५ वर्षासाठी पंतप्रधानांनी निश्चित केली अनेक उद्दिष्टे …

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या उत्सवानिमित्त पंतप्रधानांनी पुढील २५ वर्षांसाठी अनेक उद्दिष्टे निश्चित केली. स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करण्यापूर्वी भारताने विकसित राष्ट्राचा दर्जा प्राप्त केला पाहिजे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या बापू, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांचे आम्ही आभारी आहोत.
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे …
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी २०४७ पर्यंत स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पाच प्रतिज्ञा घेऊन पुढे जाण्याचे आवाहन केले.
२०४७ सालासाठी पंतप्रधान मोदींच्या पाच प्रतिज्ञा आहेत – विकसित भारत, गुलामगिरी हटाव, वारशाचा अभिमान, एकता, नागरिकांचे कर्तव्य.
पंतप्रधान मोदींच्या राजघाट भेटीपासून या उत्सवाची सुरुवात झाली जिथे त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला.
मार्च २०२१ मध्ये सुरू झालेल्या आझादी का अमृत महोत्सव या मेगा इव्हेंटद्वारे स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. देशभरातील राष्ट्रीय स्मारके आणि प्रतिष्ठित इमारती तिरंग्याच्या दिव्यांनी उजळून निघाल्या आहेत.
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या जवानांनी आज मिशन ‘अमृतरोहण’ म्हणून एकत्रितपणे ७५ शिखरांवर चढाई केली आणि त्या ७५ शिखरांवर राष्ट्रध्वज फडकवला.
पहिल्यांदा, सरकारने लोकांना तीन दिवस घरांमध्ये ध्वज प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी ध्वज कायदेही बदलावे लागले.
२१ तोफांच्या सलामीमध्ये प्रथमच स्वदेशी बनावटीच्या हॉवित्झरचा वापर करण्यात आला. संरक्षण संशोधन संस्था DRDO ने विकसित केलेली Advanced Towed Artillery Gun System (ATAGS) हे पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया मोहिमेचे प्रमुख उत्पादन आहे.
राष्ट्रीय राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी १०,००० हून अधिक सैनिक बहुस्तरीय सुरक्षा घेरात तैनात करण्यात आले आहेत. एंट्री पॉईंटवर फेशियल रेकग्निशन सिस्टीम कॅमेरे बसवण्यात आले होते.
यावर्षी, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सांस्कृतिक, नैसर्गिक आणि धार्मिक वारसा दर्शवणाऱ्या इमारती आणि लाल किल्ल्याच्या भिंती प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांच्या पोस्टर्सने सजल्या होत्या.
महिलांचा सन्मान आणि स्वाभिमान
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्यसाधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन नारी शक्तीच्या सन्मानावर अधिक भर दिला. “हम वो लोग हैं, जो जीव में शिव देखते हैं, हम वो लोग हैं, जो नर में नारायण देखते हैं, हम वो लोग हैं, जो नारी को नारायणी कहते हैं, हम वो लोग हैं, जो पौधे में परमात्मा देखते हैं, हम वो लोग हैं, जो नदी को मां मानते हैं, हम वो लोग हैं, जो कंकड-कंकड में शंकर देखते हैं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी महिलांचा अपमानापासून मुक्तीचा संकल्प आपण केला पाहिजे असंही म्हटलं.यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांचा अपमान होणाऱ्या घटना बंद व्हायला हव्यात असे म्हटले.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भ्रष्टाचार, घारणेशाही संपवायला हवी. त्यासाठी मला जनेतची साथ हवी आहे, असे आवाहन केले. विशेष म्हणजे त्यांनी आगामी २५ वर्षांमध्ये भारत हा विकसित देश म्हणून ओळखला जाण्यासाठी संकल्प करण्याचा आवाहन केले. देशातील नागरिकांना राष्ट्रविकासासाठी त्यांनी ‘पंचप्राण’ ही संकल्पना सांगितली.
आज जग पर्यावरणाच्या समस्येला तोंड देत आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्या सोडवण्याचा मार्ग आपल्याकडे आहे. यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला वारसा आहे. स्वावलंबी भारत, ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची, समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी बनते. स्वावलंबी भारत, हा सरकारचा अजेंडा किंवा सरकारी कार्यक्रम नाही. ही समाजाची जनआंदोलन आहे, जी आपल्याला पुढे न्यायची आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदींची पंचप्राण संकल्पना काय आहे?
“आपल्याला आपल्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करायला हवं. देश यापुढे पंचप्राण आणि मोठे संकल्प घेऊन पुढे जाणार आहे. भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करायची आहे. हा पहिला प्राण आहे. दुसरा प्राण गुलामीचा अंश बाहेर काढणे हा आहे. गुलामीपासून मुक्ती मिळवायला हवी. आपल्या मनात गुलामीचा थोडाजरी अंश असेल तर तो काढून टाकला पाहिजे. तिसरा प्राण म्हणजे आपल्याला आपल्या वारशाप्रती गर्व असला पाहिजे. कालबाह्य गोष्टींना सोडून नव्या गोष्टी स्वीकारण्याचा आपला वारसा आहे. चौथा प्राण खूप महत्त्वाचा आहे. हा प्राण म्हणजे एकता आणि एकजुटता होय. १३० कोटी जनतेमध्ये एकता हवी. एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नासाठी एकजुटता हा चौथा प्राणआहे. पाचवा प्राण म्हणजे नागरिकांच कर्तव्य हे आहे. यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचादेखील समावेश आहे. आगामी २५ वर्षातील संकल्प पूर्ण करण्यासाठी ही फार महत्त्वाची प्राणशक्ती आहे,” अशे म्हणत मोदी यांनी पंचप्राणची संकल्पना सांगितली.