WorldNewsUpdate : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दीवर प्राणघातक हल्ला…

न्यूयॉर्क : जग प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एका हल्लेखोराने हल्ला केला. आरोपीने लेखकाच्या मानेवर व पोटात वार करून गंभीर जखमी केले. सध्या ते हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असून त्यांचा एक डोळा निकामी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवली आहे.
न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान रश्दी यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रश्दी गंभीर जखमी झाले, त्यांना नंतर जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सगळ्या दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने (रब्बी चार्ल्स) या हल्ल्याबद्दल माहिती दिली आहे. रश्दींवर हल्ला झाला तेव्हा रश्दी ज्या सभागृहात भाषण करणार होते तिथे रब्बी चार्ल्स उपस्थित होते. रब्बी चार्ल्स यांनी सांगितले की, हल्लेखोर प्रथम रश्दी उपस्थित असलेल्या प्लॅटफॉर्मवर चढला, ज्यामध्ये इतर अनेक लोक होते. यानंतर तो रश्दीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला. ही व्यक्ती काय करू पाहत होती हे कोणालाच समजू शकले नाही. दरम्यान तेथे उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांना काही समजण्यापूर्वीच हल्लेखोराने रश्दींवर हल्ला केला. सुमारे २० सेकंदांपर्यंत आरोपींनी रश्दी यांच्यावर एकामागून एक सपासप १० ते १५ वार केले. त्याचवेळी, एपीच्या एका रिपोर्टरने देखील पुष्टी केली आहे की हल्लेखोराने रश्दीवर किमान १५ वार केले आहेत.
हेलिकॉप्टरने नेले रुग्णालयात…
न्यूयॉर्क पोलिसांनी या घटनेबाबत चाकू हल्ला झाल्याची पुष्टी केली आणि सांगितले की, रश्दी यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यात मुलाखत घेणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. काही फोटोंमध्ये हल्ल्यानंतर स्टेजवर रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसत आहेत. वृत्तानुसार, रश्दी शुक्रवारी व्याख्यान देणार होते, तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतीय वंशाचे इंग्रजी लेखक रश्दी १९८० च्या दशकात त्यांच्या Satanic Verses या पुस्तकावरून वादात सापडले होते. या पुस्तकाबद्दल मुस्लिम समाजात प्रचंड रोष होता, इराणसह अनेक देशांमध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. इराणच्या एका धार्मिक नेत्याने त्यांच्या मृत्यूवर फतवाही काढला होता. तेव्हापासून रश्दी हे मुस्लीम कट्टरवाद्यांचे वारंवार लक्ष्य बनले आहेत.
दिल्लीस्थित ब्रिटीश लेखक विल्यम डॅलरिम्पल यांनी रश्दी यांच्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांना दुखापत होऊ नये अशी आशा व्यक्त केली. दरम्यान असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने असे म्हटले आहे की , त्याच्या रिपोर्टरने चौटाका इन्स्टिट्यूटमधील एका व्यक्तीला वेगाने स्टेजजवळ येताना पाहिले. ओळख होत असतानाच या व्यक्तीने रश्दींवर हल्ला केला. यामुळे रश्दी जमिनीवर पडले, नंतर या व्यक्तीवर नियंत्रण आणले गेले.