MaharashtraPoliticalUpdate : शिंदे – फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, १८ मंत्र्यांना दिली शपथ …

मुंबई : शिंदे – फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा महाराष्ट्रात विस्तार झाला आहे. भाजप आणि शिंदे गटातील ९-९ आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना नव्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह इतर शिवसेना आमदारांनी उद्धव सरकार पाडले. यानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून दोघेही द्विसदस्यीय मंत्रिमंडळ म्हणून काम करत होते. यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत होती. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि शिंदे अनेकवेळा दिल्लीला गेल्याचे बोलले जात आहे. आता शिवसेना कुणाची यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील युद्ध आणखी तीव्र होणार आहे.
दरम्यान महाविकास आघाडीतील वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीच विरोध दर्शवला असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे एकाही महिला नेत्याला संधी न देण्यात आल्याने सरकारवर टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे . राठोड यांच्या मंत्रिपदावरून होणारी टीका लक्षात घेता या टीकेला उत्तर देताना , संजय राठोड यांनी मंत्रीपद देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंचा असून, चित्रा वाघ यांची टीका वैयक्तिक असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. आता आपण दुप्पट वेगाने काम करु असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चीट दिली होती, त्यामुळे त्यांना स्थान देण्यात आलं आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणाचं काही म्हणणं असेल तर ते ऐकून घेतलं जाईल असं एकनाथ शिंदे यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
या मंत्रीमंडळ विस्ताराला राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. शपथविधी कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी या मंत्रीमंडळ विस्तारावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “ज्या नेत्यांवर आरोप झाले आणि ज्यांना अद्याप क्लीन चिट मिळाली नाही त्यांना टाळलं असतं तर बरं झालं असतं,” असं मत पवारांनी व्यक्त केलं. त्यावर तुम्ही कोणत्या मंत्र्यांच्या नावाबद्दल बोलताय ? असे विचारले असता, त्यांनी नाव घेणे टाळले.
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2022
पंतप्रधानांकडून अभिनंदन
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया देताना नव्या टीमचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , “महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.”
Yeh aaj ki rajniti hai! Kal kuch aur tha aaj kuch aur… girgit bhi sharmaye inka rang badalta dekhke.. pic.twitter.com/ucy31Qy7hA
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) August 9, 2022
इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया
मंत्रिमंडळ विस्तारानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया देताना , भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये किरीट सोमय्या संजय राठोड यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.