SanjayaRautNewsUpdate : संजय राऊत यांच्या अटकेवर मुख्यमंत्री , निलेश राणे पाठोपाठ जया बच्चन यांचीही प्रतिक्रिया …

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर राजकीय नेत्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. त्यात कोणी संजय राऊत यांच्या बाजूने बोलत आहे , कोणी विरोधात तर कोणी सावध प्रतिक्रिया देत आहेत. यावरील एकनाथ शिंदे , निलेश राणे यांच्यापाठोपाठ आता प्रसिद्ध सिने अभिनेत्री जया बच्चन यांचीही प्रतिक्रिया आली असून त्यात त्यांनी २०२४ पर्यंत हे चालू राहील असे म्हटले आहे.
संजय राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली. राऊत यांच्या घरातील झडतीच्या दरम्यान संजय राऊत यांच्या घऱी साडेअकरा लाखांची रक्कम सापडली होती. त्यापैकी १० लाखांच्या नोटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या पैशांच्या पाकिटावर तुमचं नाव असून शिवसेनेकडून चौकशीची मागणी होत असल्याचं एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं. यावर ते म्हणाले “माझी चौकशी करण्यापेक्षा, ज्यांच्या घरात पैसे सापडले आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे”. संजय राऊतांची चौकशी सुरु असून जे काही सत्य असेल ते समोर येईल असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.
जया बच्चन यांची प्रतिक्रिया
दरम्यान खा. संजय राऊतांना ई़डीने अटक केल्यानंतर या प्रकरणावर अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटर वरील व्हिडीओ मध्ये त्यांना जेंव्हा , ‘संजय राऊतांना अटक करण्यात आली त्यात ईडीचा गैरवापर झाला, असे तुम्हाला वाटते का?’ असा प्रश्न जय बच्चन यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या कि , “नक्कीच. आमचा संजय राऊतांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. सध्या ईडीच्या कामाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. फक्त ११ लाख रुपयांसाठी तुम्ही अशाप्रकारे एखाद्याला त्रास देत आहात.” यापुढे त्यांना संजय राऊतांच्या आईबद्दल विचारण्यात आले. ‘राऊत यांची आई खूप म्हातारी आहे.’ त्यावर त्यांनी ‘हो मला माहिती आहे’, असे म्हटले.
यापुढे त्यांना ‘ईडीचा हा अशाप्रकारे सुरु असलेला अवाजवी वापर आणखी किती दिवस चालेल असे तुम्हाला वाटते’, असे विचारण्यात आले. त्यावर जया बच्चन यांनी “२०२४ पर्यंत” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो…
दरम्यान भाजपने पुन्हा एकदा यावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रविवारी संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापेमारी आणि चौकशी केल्यानंतर पुढील चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेत असताना संजय राऊत यांनी आपल्या आईला मारलेल्या मिठीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. यावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
निलेश राणे यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. दुसऱ्यांच्या घरात पण आई असते. मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत यांनी विसरता कामा नये. हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होतं, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.