SanjayRautNewsUpdate : “कर नाही तर डर कशाला ? ” खा. संजय राऊत प्रकरणी मुख्यमंत्री…

औरंगाबाद : ईडीच्या कारवाईला घाबरून कुणी आमच्याकडे येत असेल तर येऊ नका, असं जाहीर आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते रविवारी (३१ जुलै) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत यांच्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना, “कर नाही तर डर कशाला ?” आज चौकशी होऊ द्या. त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. ते महाविकासआघाडीचे मोठे नेते होते. दरदिवशी ९ वाजता तुम्ही त्यांची बाईट घेत होते,” अशी प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले कि , “संजय राऊतांना कुणी आपल्या पक्षात बोलावलं आहे का, आमंत्रण दिलं आहे का? मी जाहीरपणे सांगतो, ईडीच्या कारवाईच्या भीतीने कुणीही येत असेल तर आमच्याकडे येऊ नका. शिवसेनेकडेही येऊ नका आणि भाजपाकडेही येऊ नका. आम्हाला दबाव टाकून कुणालाही पक्षात घ्यायचं नाही. अर्जुन खोतकर असू द्या, अन्यथा आणखी कुणी असू द्या मी जाहीर आवाहन करतो की ईडीच्या कारवाईला घाबरून कुणीही असलं पुण्याचं काम करू नका.”
“केंद्रीय तपास संस्थांनी यापूर्वी देखील काही कारवाई केल्या आहेत. त्यांनी सुडाने काम केलं असतं, चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असती तर न्यायालयाने त्यांना लगेच दिलासा दिला असता. यापूर्वीच्या देखील कारवाया तपासून घ्या. आम्ही एवढं मोठं सरकार बनवलं त्यात एक तरी सुडाची कारवाई केली का? आमच्यापैकी एका आमदाराने तरी सांगितलं का की ईडीने नोटीस पाठवली म्हणून आम्ही तिकडे गेलो. असं कुणी म्हणालं का?” असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला.