GujraTnewsUpdate : धक्कादायक : गुजरातमध्ये अवैध दारूचे २८ बळी , खुनाच्या आरोपाखाली १४ जणांविरुद्ध गुन्हा

अहमदाबाद : गुजरातमधील बोताड जिल्ह्यात कथितरित्या बनावट मद्य सेवनामुळे मृतांची संख्या २८ झाली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी गांधीनगरमध्ये पत्रकारांना सांगितले की, ही दारू अत्यंत विषारी मिथाइल अल्कोहोलपासून बनवण्यात आली होती. ते म्हणाले की, खून आणि इतर गुन्ह्यांच्या आरोपाखाली १४ लोकांविरुद्ध तीन एफआयआर नोंदवण्यात आले असून त्यापैकी बहुतेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली जेव्हा बोताडच्या रोझीद गावात आणि आसपासच्या इतर गावात राहणाऱ्या काही लोकांची प्रकृती खालावल्याने त्यांना बरवाला परिसर आणि बोताड शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याविषयी बोलताना भाटिया म्हणाले की, बनावट दारूच्या सेवनामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २२ बोताड जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील, तर सहा शेजारील अहमदाबाद जिल्ह्यातील होते. याशिवाय ४५ हून अधिक लोक सध्या भावनगर, बोताड आणि अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल आहेत. भाटिया म्हणाले, “फॉरेन्सिक विश्लेषणात असे दिसून आले आहे की पीडितांनी मिथाइल अल्कोहोलचे सेवन केले होते. आम्ही खून आणि इतर गुन्ह्यांच्या आरोपाखाली १४ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि बहुतेक आरोपींना आधीच ताब्यात घेतले आहे.” गुजरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि अहमदाबाद गुन्हे शाखा देखील तपासात गुंतलेली आहेत.
गुजरातच्या दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी राज्यात दारूबंदी लागू असूनही अवैध दारूची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
अवैध दारू विक्री करणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याचा आरोप करत दारूविक्रीतून कमावलेल्या पैशाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. केजरीवाल यांनी मंगळवारी सांगितले की ते भावनगरमधील एका हॉस्पिटलला भेट देणार आहेत जिथे काही लोकांना बनावट दारू पिऊन आजारी पडले होते.