ParliamentNewsUpdate : लोकसभेत गोंधळ , काँग्रेसचे चार खासदार निलंबित

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत झालेल्या गदारोळावर सभापती ओम बिर्ला यांनी कठोर भूमिका घेतली आहे. गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या चार सदस्यांना त्यांनी निलंबित केले आहे. काँग्रेसच्या या चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.
Four Congress Lok Sabha MPs including Manickam Tagore, Ramya Haridas, Jothimani and TN Prathapan suspended for the entire Monsoon session pic.twitter.com/p2qb2oKshf
— ANI (@ANI) July 25, 2022
ज्योतिमनी, मणिकम टागोर, टीएन प्रथापन आणि रम्या हरिदास अशी या निलंबित खासदारांची नावे आहेत. विरोधी खासदारांच्या सततच्या गदारोळात सभापती ओम बिर्ला यांनी दुपारी २.३० वाजता लोकसभेचे कामकाज तहकूब करताना कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले होते. दरम्यान फलक दाखवणाऱ्यांना हाऊसमधून हाकलून देण्याचे संकेत त्यांनी दिले होते. यानंतर बिर्ला यांच्या दालनात सर्व पक्षांची बैठक झाली ज्यामध्ये विरोधी पक्षांनी सभापती बिर्ला यांना सभागृहात फलक न दाखवण्याचे आणि गदारोळ न करण्याचे निर्देश दिले. मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांनीही सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले असतानाही सभागृहात फलक लावून गदारोळ झाला. यानंतर सभापती बिर्ला यांनी कठोर निर्णय घेत चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
तत्पूर्वी, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या गदारोळावर भाष्य करताना, सभापतींच्या सक्त सूचनेनंतरही सभागृहात फलक घेऊन येणाऱ्या सदस्यांवर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून सभागृहाचे कामकाज विनाकारण थांबून जाईल. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात कोणतेही अडथळे आणू नका. तरीही हा गोंधळ झाला.
दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या उरलेल्या कालावधीसाठी लोकसभेतील चार सदस्यांचे निलंबन झाल्यानंतर सरकारचा हा विरोधी पक्षांना झुकविण्याचा प्रयत्न असला तरी काँग्रेस झुकणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. या चार निलंबित सदस्यांच्या उपस्थितीत लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई म्हणाले, “सरकार आमच्या खासदारांना निलंबित करून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. या सदस्यांचा काय दोष? ते केवळ जनतेशी निगडित मुद्दे मांडत होते.” त्यानंतर निलंबित सदस्यांनी संसद भवन संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणेही केले.