BJPNewsUpdate : शिवसेनेनेच आमच्याशी गद्दारी केली , फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप

पनवेल : भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान हल्लाबोल केला. “शिवसेनेने २०१९ मध्ये भाजपाशी गद्दारी केली. मी साक्षीदार आहे की आम्ही त्यांना कोणताही शब्द दिला नव्हता. पंतप्रधान मोदीजी, अमित शाह, उद्धव ठाकरे सारेच सांगत होते की फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवसेना राष्ट्रवादीचे आधीच ठरले होते. निवडणूक निकालाच्या आधीच, आमचे मार्ग खुले, असे ते सांगू लागले. मी फोन केले पण त्यांनी फोन घेतले नाहीत. कारण त्यांचं आधीच ठरलं होतं”, असा थेट आरोप त्यांनी आज उद्धव ठाकरेंवर केला.
राज्यातील परिवर्तन वैचारिक , सत्तेसाठी नव्हे …
दरम्यान राज्यातील सत्तांतराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, हे सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठी झालेले परिवर्तन आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी हे आवश्यक होतं आणि अनेक कथा-कहाण्या तयार झाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, ही घोषणा झाली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. हे अचानक घडलं नव्हतं, हे ठरवून घडलं होतं. ते एवढे लोक घेऊन येत असताना, त्यांना नेतृत्व देणं महत्त्वाचं तर होतंच, पण त्याहूनही महत्वाचं होतं, तर भारतीय जनता पार्टी सत्तापिपासू नाही, आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे म्हणून आम्ही सरकार पाडतो, अशांपैकी आम्ही नाही. तर आमची विचाराची लढाई आहे. आता जी मायनॉरिटीत आली आहे, त्या शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली.
एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी …
एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना असल्याचे नमूद करून फडणवीस पुढे म्हणाले , एकनाथ शिंदे यांनी ठरवलं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांच्या विचारांशीच फारकत घेतली जात असेल, ज्यांच्यासोबत आम्ही लढाया केल्या त्यांच्याच अधिपत्याखाली आम्हाला काम करावे लागत होते.
ज्यांच्याबद्दल स्वतः बाळासाहेब असं म्हणाले, की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा माझ्या पक्षाचं दुकान मी बंद करेन. त्यांच्याच सोबत जर जावं लागत असेल, ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या सोबत जावं लागत असेल, एवढेच नाही, तर स्वा. सावरकरांचा रोज अपमान होत असताना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा, दाऊदशी संबंधित प्रकरणात मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्या विरोधात अक्षर बोलता येत नाही. त्याला मंत्री पदावरून काढायची हिंमत नेते दाखवू शकत नाही. अशा परिस्थितीत जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक होता, तो हे सहन करू शकत नव्हता.
एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना ते म्हणाले कि , एक हिंमतीचा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा, हा बाहेर पडला. ज्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला, तेव्हा ठरलं नव्हतं सरकार येईलच, कदाचीत असेही घडले असते, की एवढे लोक नसते आले तर त्यांचे राजकीय सामाजिक जीवन, कमावलेली पुण्याई कदाचित समाप्त करण्यात आली असती, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. एवढेच नाही, तर आपण मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा का केली, याचा खुलाही फडणवीस यांनी यावेळी केला. ते पनवेलमध्ये सुरू असलेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.