MaharashtraNewsUpdate : ज्येष्ठ लेखक अनंत उर्फ नंदा खरे यांचे निधन

पुणे : मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकाळापासून आजारी होते. नंदा खरे यांच्या निधनामुळे साहित्य विश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अनंत खरे यांची ओळख नंदा खरे अशी होती. नंदा खरे याच नावाने ते साहित्य लेखन करायचे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या गाजल्या आहेत. नंदा खरे यांची ‘अंताजींची बखर’ ही कांदबरी गाजली होती. ‘उद्या’ नावाच्या कादंबरीसाठी त्यांना २०२० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता. पण तो त्यांनी नाकारला होता. मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिले असे म्हणत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. अलिकडेच त्यांची ‘नांगलल्यावीन भूई’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती.
नंदा खरे यांनी मुंबई आयआयटीमधून पदवी घेतली होती. त्यांनी अभियंता म्हणून कामही केले आहे. नंदा खरे यांच्या निधनानंतर साहित्य विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
नंदा खरे यांच्या गाजलेल्या साहित्य संपदेमध्ये प्रामुख्याने “वीसळे पन्नास”, “वारुळपुराण”, “कहाणी मानव प्राण्यांची” , ‘अंताजीची बखर’, ‘नांगलल्यावीन भूई’ या साहित्याचा समावेश आहे.
लेखक नंदा खरे यांचा विवाह सन १९६९ साली झाला. त्यांच्या पत्नी विद्यागौरी ह्यांनी इंग्रजी साहित्यात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांच्या कन्या नर्मदा ह्यांनी पेशी-विकास शास्त्र व जनुकशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. तसेच त्यांचे पुत्र अमिताभ खरे यांनी औद्योगिक अभियांत्रिकीत मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली आहे.