MadhyaPradeshNewsUpdate : मेरे देशमे : …आणि लहान भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन ८ वर्षाचा भाऊ… इथे ओशाळला मृत्यू !!

इंदौर : हि घटना आहे मध्य प्रदेश सरकारने मुरैना या शहरातली . येथील जिल्हा रुग्णालयात मरण पावलेल्या दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह नेण्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्याने एका पित्याची आणि त्याच्यासोबत आलेल्या दुसऱ्या मुलाची जी परवड झाली त्यावरून इथे ओशाळला मृत्यू असेच म्हणावे लागत आहे .
माणुसकीला लाजवेल अशी घटना मध्य प्रदेशातील मुरैना येथून समोर आली आहे. येथे आठ वर्षांच्या मुलाला रस्त्याच्या कडेला आपल्या भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन तासनतास बसावे लागले. मात्र त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. मृत बालकाचे वडील मृतदेह नेण्यासाठी जिल्हा रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिका किंवा अन्य वाहन शोधत राहिले, मात्र त्यांना कोणतेही वाहन सापडले नाही, मात्र प्रकरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. .
या प्रकरणात गाजावाजा झाल्यानंतर रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हि घटना मुरैना जिल्हा रुग्णालयातील आहे. मुरैना जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, लवकरच अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान संबंधित कुटुंबाला आता विविध शासकीय योजनांतर्गत आर्थिक मदत देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरैना जिल्ह्यातील अंबा येथील बडफरा गावात राहणारे पूजाराम जाटव हे त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला (राजा) उपचारासाठी मुरैना येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन आले होते. अशक्तपणा आणि पोटात जास्त पाणी भरल्याने राजा यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्या रुग्णवाहिकेतून राजाला आणले होते ती रुग्णालयात पोहोचल्यानंतरच परत आली. अशा स्थितीत राजाच्या मृत्यूनंतर त्याचे वडील पूजाराम यांनी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मृतदेह गावी नेण्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्यास सांगितले. पूजाराम यांची आर्थिक स्थिती बरोबर नसल्याचे कारण सांगून त्यांना रुग्णालयातून सरकारी रुग्णवाहिका मिळेल, अशी आशा होती. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयात वाहन नसल्याचे सांगून नकार दिला. गाडी हवी असेल तर हॉस्पिटलच्या बाहेरून भाड्याने घ्यावी लागेल असे सांगितले होते.