MaharashtraPoliticalUpdate : हे सरकार काळजीवाहू, कोणत्याही मंत्र्याला शपथ देऊ नये , शिवसेनेचे राज्यपालांना पत्र …

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे आणि त्यावर सुनावणी व्हायची आहे. सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र घटनापीठापुढे ही सुनावणी घेईल. तोपर्यंत हे सरकार आणि मुख्यमंत्रीपद बेकायदेशीर आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्यपालांनी कोणत्याही मंत्र्याला शपथ देऊ नये आणि या सरकारला कोणतेही अधिकार देऊ नये. हे सरकार काळजीवाहू आहे. आणि कोणतेही लाभाचे पद किंवा कोणतीही शपथ देणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेकायदेशीर ठरेल, असे पत्र शिवसेनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान या पत्रात राज्यपालांना पुढे विनंती करण्यात आली आहे की, राजभवनातून यापुढे कोणतेही घटनाबाह्य काम होणार नाही, याची ग्वाही महाराष्ट्राला आहे. जे झाले ते झाले पण ही कायद्याची लढाई आहे आणि ती सुरूच राहील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितेल आहे की, हा विषय अत्यंत गंभीर आहे. राज्यघटनेतील घडामोडींशी हा संबंधित आहे. जेव्हा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सरन्यायाधीश रमणा यांनी युक्तिवाद करू नये, असे सांगितले. हा सर्व विषय आम्हाला ऐकायचा आहे, त्यासाठी आम्ही वेगळे घटनापीठ स्थापन करू. तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.