ShivsenaNewsUpdate : राष्ट्रपती उमेदवाराचा पाठिंबा आणि पक्षाचे चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे चिंतीत …

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या खासदारांच्या बैठकीला १९ पैकी १२ खासदार उपस्थित होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका काही खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली . मात्र शिवसेनेने युपीएचे उमेदवार यशवंत सिंह यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका खा. संजय राऊत यांनी मांडली . याबाबत आपण दोन दिवसात निर्णय घेऊ असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पक्षात उघड उघड दोन गट पडले असल्याने पार्टी आणि पक्षाचे चिन्ह धन्यष्यबाण कसा वाचवता येईल या दृष्टीने उद्धव ठाकरे प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण पक्षाच्या तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हदेखील जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. असे होऊ नये म्हणून शिवसेनेने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती शिवसेनेने केली केली आहे. हि विनंती करताना शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक कॅव्हेट दाखल केले असून यामध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी केली आहे.
शिंदे गटाला वाढत पाठिंबा
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर आता काही खासदारदेखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच स्थानिक पातळीवर काही नगरसेवक आणि कार्यकर्तेदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा केलेला आहे. आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरदेखील दावा केला जाऊ शकतो. असे असताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वरील मागणी करणारे कॅव्हेट दाखल केले आहे.