IndiaNewsUpdate : पीएम मोदींनी तोडले मौन, म्हणाले …माँ कालीचे देशावर सदैव अमर्याद आशीर्वाद…

नवी दिल्ली : देशात अनेक वादग्रस्त मुद्दे असले आणि अशा वादग्रस्त मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांनी बोलावे असे देशाला कितीही वाटत असले तरी, कोणत्या मुद्द्यावर बोलायचे आणि कोणत्या मुद्द्यावर नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ठरवतात. आज त्यांनी चित्रपट दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांनी देवी कालीचे पोस्टर शेअर केल्यानंतर देशात निर्माण झालेल्या वादावर अप्रत्यक्ष टिप्पणी केली आहे.
मा कालीच्या मुद्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, प्रत्येक गोष्ट आईच्या ( माँ कालीच्या ) चेतनेमध्ये व्यापलेली असते. माँ कालीचा आशीर्वाद सदैव देशावर आहे. रविवारी स्वामी आत्मस्थानंदजींच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींनी आभासी भाषण केले. यावेळी त्यांनी माँ कालीबद्दल या गोष्टी सांगितल्या.
पीएम मोदी म्हणाले, “मां कालीचे अमर्याद आशीर्वाद सदैव भारतावर आहेत. आज भारत या अध्यात्मिक उर्जेने विश्व कल्याणाच्या भावनेने पुढे जात आहे. ते म्हणाले, “जेव्हा श्रद्धा शुद्ध असते, तेव्हा शक्ती आपल्याला थेट मार्गदर्शन करते. म्हणूनच माँ कालीचे अपार आशीर्वाद भारतावर आहेत.”
या समारंभात पीएम मोदी म्हणाले की, स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी माँ कालीचे साक्षात दर्शन घेतले होते. त्यांनी माँ कालीच्या चरणी सर्वस्व अर्पण केले होते. ते म्हणाले की, हे सर्व जग, हे परिवर्तनशील आणि स्थिर, सर्व काही आईच्या चैतन्याने व्याप्त आहे. पीएम म्हणाले, बंगालच्या काली पूजेमध्ये ही जाणीव दिसते. बंगाल आणि संपूर्ण भारताच्या श्रद्धेमध्ये हे चैतन्य दिसून येते. आणि जेव्हा विश्वास इतका शुद्ध असतो तेव्हा शक्ती आपल्याला मार्गदर्शन करते.
वाद काय आहे ?
लीना मनिमेकलाई यांच्या ट्विटबाबत हरिद्वारमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. वास्तविक, त्यांनी ‘काली’ या माहितीपटाचे एक वादग्रस्त पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये कालीचे रूप सिगारेट ओढताना दाखवण्यात आले होते. अशा परिस्थितीत आता हरिद्वारमध्ये चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई आणि त्यांच्या टीममधील इतर दहा लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
काली या चित्रपटाच्या पोस्टरनंतर झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशावर कालीमातेची कृपा असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींचे हे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही जोडले जात आहे कारण त्यांच्या पक्षाच्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी माता कालीबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मोईत्रा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपाने त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
काय म्हणाल्या महुआ मोईत्रा?
यासंदर्भात बोलताना महुआ मोईत्रा यांनी प्रत्येकाला आपल्या इश्वराविषयी कल्पना करण्याचं स्वातंत्र्य आहे, असं म्हटलं आहे. “माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे. तुमच्या ईश्वराविषयी कल्पना करण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी ईश्वराला व्हिस्की नैवेद्य म्हणून दिली जाते, तर काही ठिकाणी ही ईश्वरनिंदा ठरते”, असे महुआ मोईत्रा म्हणाल्या आहेत.