HingoliNewsUpdate : हिंगोलीत मुसळधार, अनेक गावांचा संपर्क तुटला, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन …

प्रभाकर नांगरे / हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून मुसळधार पावसाने आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. तर कुरुंदा हे गाव पाण्याखाली गेले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर हि बाब जाताच त्यांनी तातडीने आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली तसेच योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
#WATCH | Maharashtra: Heavy rains cause flooding in Hingoli pic.twitter.com/p3HUjNEgRH
— ANI (@ANI) July 9, 2022
गेल्या तीन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात पावसाची संततधार चालू आहे . यामुळे आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
विशेषतः रात्री हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अनेक गावांमध्ये झालेल्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झाले आहे.