AurangabadNewsUpdate : ग्रामसेवकास पाच हजाराची लाच स्वीकारताना अटक

मनिषा पाटील / सोयगाव : रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत चालू असलेल्या विहिरीवरील काम करणाऱ्या मजुरांच्या हजेरीपटावर सही करण्यासाठी लाच घेतांना वरठाण ता.सोयगाव येथील ग्रामसेवकाला लाचलुचपतविरोधी पथकाने गुरुवारी वरठाण-पाचोरा रस्त्यावर पाच हजार रु ची लाच घेतांना रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. मजुरांच्या हजेरी पटावरील स्वाक्षरी साठी मागितलेली दहा हजार रु पैकी तडजोडी अंती पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक चतुर्भुज झाला आहे. या घटनेमुळे पंचायत विभागात खळबळ उडाली आहे.
विजय पिराजीराव जोंधळे (वय ४७) असे रंगेहात पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचे आईच्या व इतर तिघांच्या शेतात रोजगार हमी योजनेच्या विहिरीचे खोदकाम सुरु होते या कामाच्या हजेरी पटावर स्वाक्षरी साठी ग्रामसेवकाने दहा हजाराची लाच मागितली होती त्यापैकी तडजोडी अंती पाच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत पथकाने वरठाण-पाचोरा रस्त्यावर सापळा रचून हि कारवाई केली आहे.
ग्रामसेवक विजय जोंधळे हे वरठाण ग्रामपंचायतीचे कामकाज उरकून पाचोराकडे जात असतांना वरठाण-पाचोरा रस्त्यावर त्यांना पाच हजाराची रक्कम स्वीकारतांना घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे.यावरून त्यांचे विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे,अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे,उप अधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत,भूषण देसाई,शिरीष वाघ,केवल घुसिंगे,प्रकाश घुगरे,रवींद्र काळे,चांगदेव बागुल आदींच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
वरठाण ता.सोयगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजय जोंधळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात लाच स्वीकारतांना अटक केल्याने या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.