Maharashtra StateAssemblyLive : मोठी बातमी : उद्या सकाळी ११ वाजता शिंदे सरकारची बहुमत चाचणी…

आजच्या विधी मंडळात कामकाजाच्या शेवटी शोक प्रस्ताव मांडून दिवंगत आमदारांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला आणि आजच्या दिवसाचे कामकाज संपले. आता उद्या सकाळी ११ वाजता विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून सरकारची मुख्य परीक्षा असणार आहे. राहुल नार्वेकर यांच्या निमित्ताने सरकारने पहिली लढाई जिंकली आहे.
आदित्य ठाकरे यांनी केली बंडखोर आमदारांवर टीका
दरम्यान बंडखोर आमदारांनी व्हीप मोडलेला आहे आणि उपाध्यक्षांकडे याचा विरोध केला आहे. एकाही पळालेल्या आमदाराने डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही. सगळे डोळे चोरून खाली किंवा दुसरीकडे बघत होते. आज त्यांनी आमच्याकडे पाहिले नाही पण मतदारांकडे गेल्यानंतर काय सांगणार? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
जयंत पाटलांचं वक्तव्य रेकॉर्डवरुन काढण्याची विनंती…
जयंत पाटील यांनी बोलताना आदिवासी असूनही अध्यक्षांनी चांगलं काम केलं असा उल्लेख केला होता. फडणवीसांनी शेवटी याचा उल्लेख करत सावरुन घेतलं. जयंत पाटील यांनी जे शब्द वापरले त्याबद्दल बोलावं, कारण बाहेर चुकीच्या अर्थाने बोललं जात आहे. ते अनावधानाने बोलले आहेत असे फडणवीस म्हणाले. त्यावर माझा कोणाला दुखवण्याचा हेतू नव्हता मी अनावधानाने बोललो असेल तर ते रेकॉर्डवरून काढून टाकावे अशी विनंती केली.
राहुल नार्वेकर यांनी मानले सभागृहाचे आभार
राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित सर्वांचे आभार मानले. महत्वाची विधायके चर्चेविना पारित केले जाणार नाहीत असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. तसे च नियमांचे पालन केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. याच सभागृहात चार माजी विधानसभा अध्यक्ष असल्याने हे माझे भाग्य असल्याचंही ते म्हणाले आहेत. मी जावई असल्याचे सांगत अजित पवार, जयंत पाटील यांनी काळजी घेण्यास सांगितलले . पण त्यांनीही जावयाची काळजी घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे योग्य सहकार्य मिळेल यात शंका नाही असे राहुल नार्वेकर म्हणाले. गेल्या काही दिवसात अनेक धक्के, भूकंप आले. त्यातील एक धक्का मलाही मिळाला. माझी निवड झाली असं सांगत त्यांनी पक्षाचे आभार मानले.
शिंदे गटाकडून १६ सदस्यांविरोधात तक्रार
दरम्यान शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या १६ आमदारांविरोधात तक्रार केली आहे. शिवसेनेचे प्रतोद असा त्यांचा उल्लेख करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष यांनी भरत गोगावले यांच्या पत्राचं वाचन केले.
जेंव्हा धनंजय मुंडे चुकतात …
धनंजय मुंडे यांनी चुकून मिलिंद नार्वेकर उल्लेख केला असता यावेळी इतर सदस्यांनी रोखलं. यानंतर एकच हशा पिकला. यानंतर सुनील प्रभू यांनी हे नाव रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची मागणी केली. “कोणतंही विधेयक चर्चेविना पारित केलं जाऊ नये. सर्वांना त्यावर बोलण्यासाठी वेळ दिला जावा,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली
हरिभाऊ बागडे यांचे अबू आझमी यांना उत्तर
यावेळी बोलताना हरिभाऊ बागडे म्हणाले कि , पहिल्या रांगेतील सदस्य बोलण्यासाठी फार वेळ घेत असल्याने मागे बसणाऱ्यांना संधी मिळत नाही . अबू आझमी यांना उत्तर देताना ते म्हणाले कि , संभाजीराजेंचे हाल करत मारणाऱ्याचं नाव शहराला मान्य नाही . सर्वच मुस्लिमांना औरंगजेबाचं नाव मान्य नाही. अनेक मुस्लिम मुलांचं नाव औरंगजेब ठेवत नाहीत.
हे अभिनंदनाचे भाषण आहे टीका करू नका : केसरकर
आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना केसर म्हणाले कि , हे अभिनंदनाचं भाषण असल्याने राजकीय भाष्य करायचं नसतं. मगाशी येथे व्हीपचा उल्लेख झाला. आम्हीदेखील व्हीपचा उल्लेख करु शकलो असतो. आम्हीदेखील अपात्रतेची कारवाई करु शकतो. पण आज आम्हाला त्यावर बोलायचं नाही आहे असं सांगत दीपक केसरकर यांनी सुनील प्रभू यांच्यावर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांची टीका
जसे आज सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना कानात सांगण्यास सांगितले. आम्ही फडणवीसांच्या कानात सांगितले तसे झाले असते तर आज वेगळी परिस्थिती असती असे सांगत आदित्य ठाकरेंनी टीका केली. दरम्यान एक तरुण व्यक्ती महत्वाच्या स्थानी बसली आहे याचा आनंद आहे. राजकारणाची पातळी खूप खालावत चालली आहे. किती तरुणांना राजकारणात उतरावंसं वाटेल असं मी म्हणत असतो. तुम्ही हा विचार बदलला अशी आशा आहे. प्रत्येकाचा आवाज आपण ऐकावा अशी आशा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांची टोलेबाजी…
अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनात नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी बोलताना जोरदार टोलेबाजी केली. “राहुल नार्वेकर फार हुशार आहेत. त्यांच्याविषयी मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच नार्वेकरांचं कायद्याचं ज्ञान चांगलं आहे. अशा लोकांवर आम्ही देखील लक्ष ठेवून असतो, असं नमूद केलं. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.
जयंत पाटील यांची मिश्किली…
अध्यक्षांचा आदर व्हावा यासाठी आपण काही यंत्रणा आणली पाहिजे. सदस्याला पूर्ण बोलू द्यावं यासाठीही प्रयत्न करणं गरजेचं आहे. एखादा सदस्य व्यक्त झाल्यावर बोलण्याची संधी असते असं जयंत पाटील म्हणाले. आमचे जावई असल्याने आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी आशा आहे. नाही तर संध्याकाळी आमच्या घरी मुलीला काय केले ते कळवू. मग संध्याकाळी आपला समाचार घेण्याची विनंती करु,” असे मिश्कीलपणे जयंत पाटील म्हणाले.
आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा देऊ शकतील, मुनगंटीवारांचा टोला
“या सभागृहाचं कामकाज उत्तम होण्यासाठी आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा देऊ शकतील. उरलेले इतरही देतील,” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. “राहुल गांधींचा आदेश आला की तुम्ही झोपता पण या राहुल गांधींचं ऐकाल अशी आशा असल्याचंही ते म्हणाले. जावई हा देवासमान असतो ही आपल्या शास्त्रातील भावना आहे. त्यामुळे वरील सभागृहात काही अडणार नाही असा मला विश्वास आहे,” असं सुधीर मुंनगंटीवार म्हणाले आहेत.
मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही – भास्कर जाधवांचा आक्षेप
दरम्यान भास्कर जाधव यांनी अबू आझमी यांच्यावर आक्षेप घेतला आणि मुस्लिमांची नावं काढली जात आहे या वाक्याला विरोध केला. औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही इतकंच सांगायचं आहे असं ते म्हणाले.
अबू आझमींनी काढला नामांतराचा विषय…
यावेळी बोलताना आ. अबू आझमी यांनी शहरांची नावं बदलून काय होणार आहे? बाळासाहेबांच्या नावे मोठी शहरं बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करु. मुस्लिमांची नावं असलेल्या शहरांची नावं बदलून काय उदाहरण दिलं जात आहे? अशी विचारणा केली.
आमदारांनी लोकशाहीची पायमल्ली केली – सुनील प्रभू
आपण अध्यक्ष होत असताना सदनात आमचा व्हीप जुगारुन ३९ सदस्यांनी विरोधात मतदान करत लोकशाहीची पायमल्ली केली हे इतिहास विसरणार नाही. ही खंत १३ कोटी जनतेच्या मनात असेल असं सांगत सुनील प्रभू यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. १०-१५ दिवसांपूर्वी सत्तेचे वारे वाहू लागले तुम्ही कायदेमंत्री व्हाल असं वाटलं होतं. या राज्यात काहीही घडू शकतं. ज्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो ते उपमुख्यमंत्री झाले. आमचं दु:ख विसरुन फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं दु:ख वाटू लागलं असं सुनील प्रभू म्हणाले आहेत.
बाळासाहेब थोरातांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. आता फडणवीस तुमचं अभिनंदन कसं करावं असा प्रश्न पडला आहे. भुजबळांनी उल्लेख केलेल्या बुद्धिबळाच्या खेळाकडे तुमचंच लक्ष नव्हतं असं वाटत आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
बाळासाहेब थोरात यांचा मिश्किल प्रश्न
तुमची आदित्य ठाकरेंशी जवळीक होती. अजित पवारांना त्यांच्यासोबत असणारं नातं सांगितलं. पण मग तुम्ही काँग्रेसच का बाजूला ठेवली का असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी विचारला. फडणवीस एका दगडात किती पक्षी मारले? असा प्रश्नही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी विचारला.
छगन भुजबळांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक मेसेज वाचून दाखवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. जगातील सर्व खेळाडूंचा पराभव करणारे विश्वनाथन यांनी अमित शाह यांच्यासोबत खेळण्यास नकार दिला असल्याचं भुजबळ म्हणाले.
अजित पवारांची तुफान फटकेबाजी
“याआधी सत्ताधारी आणि आता विरोधी बाकावरुन पाहिलं तरी समोर मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्तच पहायला मिळत आहेत. ते पाहून मूळच्या भाजपाच्या लोकांचं वाईट वाटतं.पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल. दिपक केसरकर तर आता कसले प्रवक्ते झाले आहेत. आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही,” असा टोला अजित पवार यांनी लगावला.
“राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी केला आहे. तुमच्याकडूनही तीच अपेक्षा आहे. तुमच्या रुपाने एक अभ्यासू, तरुण नेतृत्व सभागृहाला मिळालं आहे. मुंबई, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर आपलं प्रभुत्व आहे. आदित्य ठाकरेंसोबतही तुम्ही काम केलं. मला मावळमध्ये उमेदवार हवा होता तेव्हा मी तुम्हाला विनंती केली. मोदी लाटेत राहुल नार्वेकर यांचा पराभव झाला. पण ते फार हुशार आहेत, माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा असं सांगितलं होतं,” असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
अजित पवारांकडून अभिनंदन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की, “आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाची कामं गतिमान होतील सभागृहाची अपेक्षा आहे. आपलं नाव जोडलं गेलं आहे हा मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे”.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा नूतन अध्यक्षांचे अभिनंदन करून म्हणाले कि , एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीचे हे सरकार महाराष्ट्राच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी तुम्ही (सभापती) चांगले सहकार्य कराल अशी आशा आहे. योगायोग म्हणजे राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष असून त्यांचे सासरे निंबाळकर विधानपरिषदेचे सभापती आहेत. जावई आणि सासऱ्याचं एकमत होत नाही असं म्हणतात असं मिश्किलपणे फडणवीस यावेळी म्हणाले.
This government of BJP-Shiv Sena alliance, under the leadership of Eknath Shinde, will try to fulfill all the aspirations of Maharashtra and we hope that you (Speaker) will give a good co-operation for the same: Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis in the State Assembly pic.twitter.com/KHqwXg9kjk
— ANI (@ANI) July 3, 2022
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांसह विजयी झाले आहेत. या विजयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केले आहे.
BJP candidate Rahul Narwekar elected as the Speaker of Maharashtra Legislative Assembly: he received a total of 164 votes in support and 107 against him.
(Source: Maharashtra Assembly) pic.twitter.com/viHOHiVhkn
— ANI (@ANI) July 3, 2022
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर विधिमंडळाच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकरांना १६४ तर शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मते पडली आहेत. खरे तर विधानसभा अध्यक्षपदाची हि निवडणूक चुरशीची ठरणार असे चित्र होते . या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. त्यानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावे , असा आदेश आमदारांना देण्यात आला होता. त्यावरून ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदार यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीतील दूरी आणखी वाढल्याचे दिसून आले कारण विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसला आपला उमेदवार द्यायचा होता.परंतु बैठकीत तडजोड झाली आणि शिवसेनेचा उमेदवार देण्याचे ठरविण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला होते परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बैठकीत शिवसेनेचा उमेदवार देण्याचे ठरले आणि यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचे वातावरण निर्माण झाले. परंतु आघाडीचा धर्म म्हणून अखेर काँग्रेसला शिवसेनेला पाठिंबा द्यावा लागला तरीही सभागृहात जे व्हायचे तेच झाले.
अशी झाली निवडणूक
मतमोजणीनंतर राहुल नॉर्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या राजन साळवी यांना १०७ इतकी मते मिळाली. तसंच रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. अखेर या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.
या मदतानास उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाची परवानगी न घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलमध्ये असलेले नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना या निवडणुकीत मतदान करता आले नाही. १० जूनला झालेल्या राज्यसभा निवडणूक आणि २० जूनला झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मत देता आले नव्हते दरम्यान उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला मतदान करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली होती. पण, त्यापूर्वीच ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
अशी सुरु झाली कार्यवाही
एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सुरुवातील शिरगणती करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांचा पहिला क्रमांक होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस बसले होते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गुलाबराव पाटील, चौथा क्रमांकावर उदय सामंत बसले होते. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर चंद्रकांत पाटील बसले होते. पण जेव्हा शिरगणती सुरू झाली तेव्हा दिलेल्या क्रमांकाने मोजणी होत नसल्याचे जयंत पाटील यांनी लक्षात आणून दिले. त्यानंतर फडणवीस यांनीही पाटील यांचा आक्षेप योग्य असल्याचे म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा शिरगणती सुरू झाली.
दरम्यान,या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आधीच व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही व्हीप बजावला आहे. या व्हीपमध्ये भाजपचे नेते राहुल नार्वेकर हे शिवसेना आणि भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहे. तसंच 2 तारखेला ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही पक्षादेश पत्रावर गटनेते म्हणून नमुद आहे. तर आमदारांनी प्रतोद म्हणून नियुक्त केले होते भरत गोगावले यांचेही पक्षादेशावर नाव आहे. या पत्राद्वारे एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा शिवसेना पक्ष त्यांचाच असल्याचा दावा केला.
महाविकास आघाडीकडूनही व्हीप बजावण्यात आला आहे. शिवसेनेनं प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला असून शिंदे गटातील बंडखोर आमदारांनाही तो लागू असणार आहे. मात्र, आमच्याकडे पुरेस संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेला व्हीप लागू होणार नाही, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.