SangliNewsUpdate : “त्या ” ९ जणांच्या सामूहिक हत्याकांड प्रकरणी मांत्रिकाच्या घराची झडती …

सांगली : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे झालेल्या ९ जणांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी आरोपी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवानच्या सोलापूरमधील घराची झडती घेण्यात आली. मिरज पोलिसांनी त्याला शुक्रवारी (१ जुलै) सोलापुरात आणत शुक्रवारी रात्री मुस्लीम पाच्छा पेठ येथील त्याच्या घराची झडती घेतली. याप्रकरणी आरोपी मांत्रिक व त्याचा साथीदार धीरज सुरवसे याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मिरज पोलिसांनी जवळपास ८ तास आरोपी मांत्रिकाच्या घराची झडती घेतली. झडतीमध्ये पोलिसांनी त्याच्या घरातून विविध वस्तू जप्त केल्या. यासाठी परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मांत्रिक अब्बास बागवान याच्यावर म्हैसाळ येथील डॉ. माणिक वनमोरे आणि शिक्षक पोपट वनमोरे या बंधूंना गुप्तधनाच्या आमिष देऊन त्यांच्या कुटुंबातील ९ जणांची विष पाजून हत्या केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, त्याला सोलापुरात आणल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीच्या वेळी कोणताही व्यक्ती बिल्डिंगच्या आवारात प्रवेश करणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. शिवाय त्यावेळी घराच्या खिडक्याही बंद करण्यात आल्या, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी झडती प्रक्रिया थांबवली. त्यानंतर आरोपीला घेऊन मिरज पोलीस पुन्हा सांगलीकडे रवाना झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.