MaharashtraPoliticalUpdate : शिवसेनेचा व्हीप जारी , राजन साळवी यांना मतदान करा , कोण आहेत हे साळवी आणि नॉर्वेकर ?

मुंबई : उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. या व्हीप नुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवींना मतदान करण्याचे आदेश प्रतोद सुनिल प्रभू यांनी दिले आहेत. सुनिल प्रभू यांनी एक पत्र जारी करुन शिवसेनेच्या आमदारांना हे निर्देश देण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपने राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात गेले असताना राजन साळवी हे निष्ठावान म्हणून शिवसेनेतच राहिले. यामुळंच त्यांना ही संधी मिळाल्याचं बोललं जात आहे. साळवी यांचा अर्ज भरतेवेळी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुनील प्रभू हे उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. शेवटी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करुन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब केला. नवनियुक्त शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसाच्या अधिवेशनात होणार आहे. त्याआधी उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. शिंदे गट आणि भाजपच्या बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे.
कोण आहेत राजन साळवी ?
कोकणातील शिवसेनेचं निष्ठावान नेतृत्व राजन साळवी
राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत.
साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत.
2009 पासून सलग तीन वेळा राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.
राहुल नार्वेकर कोण आहेत ?
शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात
तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार
भाजप-शिंदे गटाकडील संख्याबळ लक्षात घेता, नार्वेकर यांची निवड निश्चित मानली जाते. विशेष म्हणजे नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक- निंबाळकर हे महाराष्ट विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यामुळे सासरे विधान परिषदेचे सभापती, तर जावई विधानसभेचे अध्यक्ष असा अपूर्व योग जुळून येऊ शकतो. निंबाळकर यांच्या कन्या सरोजिनी या नार्वेकर यांच्या पत्नी आहेत.