AurangabadCrimeUpdate : कारागृहातून फरार झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला पाच वर्षानंतर रेल्वे पोलिसांकडून अटक

औरंगाबाद : पाच वर्षांपूर्वी हर्सूल कारागृह पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या शिक्षक व १४ वर्षाच्या मुलाच्या खुनातील आरोपीला रेल्वे पोलिसांनी परतूरमधून अटक केल्याची माहिती रेल्वे पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी “महानायक” शी बोलतांना दिली.
औरंगाबादच्या रेल्वेस्थानक परिसरात झालेल्या शिक्षकाच्या खुनात अटक झाल्यानंतर हर्सूल कारागृह पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या आरोपीला शोधून काढण्यात रेल्वे पोलिसांच्या पथकाला अखेर यश आले आहे. फरार झाल्यानंतर नाव बदलून आरोपी परतूरमध्ये दडून बसल्याची माहिती खबऱ्याकडून मिळताच रेल्वे पोलिसांच्या पथकाने परतूर गाठून त्याच्या मुसक्या आवळल्या. सोनू दिलीप वाघमारे (२३) असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा औरंगाबादच्या राजीवनगर भागातील राहणार आहे. सध्या त्याला औरंगाबादमध्ये आणले जात आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी औरंगाबादच्या रेल्वेस्थानक परिसरात एक शिक्षक तसेच एका चौदा वर्षीय मुलाचा खून झाला होता. त्या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी (महाराष्ट्र पोलिस) पाच जणांना अटक केली होती. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना हर्सूल कारागृहात हलविण्यात आले होते. तेथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्यातील दोघे जण कारागृह पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले होते. मात्र, त्यातील एकाला काही तासांतच पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले होते.
मात्र, दुसरा आरोपी सोनू दिलीप वाघमारे फरार होण्यात यशस्वी झाला होता. गेली पाच वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, सोनू वाघमारे नाव बदलून परतूरमध्ये राहत असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. रेल्वे पोलिसांनी मिळालेली माहिती गुप्त ठेवून त्यानुसार सापळा रचला. आधी सोनूच्या विरोधात वॉरंट काढण्यात आले. त्यानंतर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आणि इतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस हवालदार दिलीप लोणारे, राहुल गायकवाड, विजय बोराडे, पोलिस नाईक कैलास वाघ आणि महिला पोलिस हवालदार सोनाली मुंडे यांचे पथक आज परतूरमध्ये पोहोचले. सोनू वाघमारे राहत असलेल्या ठिकाणी पोहोचताच या पथकाने दुपारी एक वाजेच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या.
सोनू वाघमारे याला घेऊन रेल्वे पोलिसांचे पथक औरंगाबादकडे निघाले असून, उद्या त्याला न्यायालयाकडून उभे केले जाईल असे समजते