NCPNewsUpdate : गुवाहाटीत बसलेल्या बंडखोर आमदारांना शरद पवारांनी सांगितले त्यांचे भविष्य !!

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांना घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला पलायन केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले भाष्य करताना शिवसेनेविरोधात बंड पुकारुन गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असे म्हटले आहे .या आमदारांना अडीच वर्ष सत्तेत असताना हिंदुत्वाचा मुद्दा अडचणीचा ठरला नव्हता. आज जेव्हा सरकारविरोधात जाण्याची संधी मिळाली तेव्हा हिंदुत्वाचे फक्त कारण पुढे केले जात आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांचा समाचार घेताना पवार म्हणाले कि , बंडखोरांनी निधी न मिळण्याबाबतचा केलेला आरोप वस्तूस्थितीला धरुन नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याच्या विरोधात आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यांनी मतदारसंघाचे फक्त कारण दिले . छगन भुजबळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यासोबत १२ ते १५ जण होते. त्यानंतर जी निवडणूक झाली होती त्यामध्ये एक-दोन जण सोडला तर बाकी सर्वांचा पराभव झाला होता, असा महाराष्ट्रातला अनुभव आहे. त्यामुळे जे लोक आता आसामला गेले आहेत त्यांच्यासोबत तसंच होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारांना निधीचा मुद्दा सांगितला आहे”, असं शरद पवार म्हणाले.
जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत, त्यातील अनेक आमदारांवर केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे किंवा होती. त्याचा परिणाम त्यांच्या निर्णयावर झाला नसेल असे म्हणता येणार नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 23, 2022
त्यांची व्यवस्था करणारे कोण आहेत ?
“अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून विधान केलं असावं. इथून प्रत्यक्ष लोक हलवणं आणि ऑपरेशन करणं यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. अजित पवारांना इतकी माहिती जरुर आहे. पण गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती (राज्याच्या बाहेरची) आम्हाला अधिक माहिती आहे . एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं विधान केलं आहे. माझ्याकडे सर्व राष्ट्रीय पक्षांची यादी आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, कम्युनिस्ट पार्टी, सीपीएन ही सहा अधिकृत पक्षांची यादी आहे. या सगळ्यांचा यात हात आहे का? जे नाहीत याचा विचार केला तर कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही”, अशी कोपरखळी पवारांनी मारली.
“सुरतला आणि आसामला जी व्यवस्था करणारे आहेत ते अजित पवारांच्या ओळखीचे आहेत, असं मला वाटत नाही. सुरतला बंडखोर नेत्यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांचा पाठिंबा होता. तिथे भाजपचं सरकार आहे. तिथे कोण आहे ते सांगण्याची आवश्यकता नाही”, असे बोलून अजित पवार यांचे म्हणणे पवारांनी खोदून काढले.
हे सरकार बहुमत सिद्ध करेल….
“अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम कारभार केलं. अनेक वर्षांचे रखडलेले निर्णय घेतले. सध्या एक संकट असताना त्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम काम केलं. ते सगळं बघितल्यानंतर हा प्रयोग फसलाय, असं म्हणणं म्हणजे हे राजकीय अज्ञान आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. “प्रसिद्धी माध्यमातील काही गोष्टी खऱ्या आहेत त्या नाकारण्याचं कारण नाही. पण ज्यावेळेला विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत ते इथे आल्यानंतर माझी खात्री आहे त्यांना ज्या पद्धतीने नेलं गेलं याची वस्तूस्थिती सांगतील. इथे आल्यानंतर आपण अजूनही शिवसेनेबरोबर आहोत हे स्पष्ट करतील आणि बहुमत कुणाचं आहे हे सिद्ध होईल. अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी अनेकदा बघितलेली आहे. या परिस्थितीवर मात करुन हे सरकार बहुमत सिद्ध करेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार चालू आहे हे देशाला कळेल”, असं शरद पवार म्हणाले.
“संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. बंडखोर आमदारांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत नाराजी आहे. त्यामुळेच संजय राऊतांनी तुमचं हेच म्हणणं असेल तर इथे येऊन सांगा आम्ही सरकारमधील पाठिंबा काढू, असं ते म्हणाले. पण ते आसाममध्ये बसून नाही तर इथे बोलून सांगा, असं त्यांनी आवाहन केलं. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं”, असं पवार म्हणाले.
राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर राज्यातील वर्तमान परिस्थितीवर भूमिका मांडली. #Pressconference pic.twitter.com/tb4MpsMjNB
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 23, 2022