ShivsenaNewsUpdate : सर्वत्र चर्चा संजय राऊत यांच्या ट्विटची …

मुंबई : राज्यातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने सुरू आहे, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. तसेच काल शरद पवार यांनीही सरकार गेले तर आम्ही विरोधी पक्षात बसू असे म्हटल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या गोटातून मात्र वेट अँड वॉच चे धोरण अवलंबले जात आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार
एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत ४० आमदार असून त्यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे असल्याचे आज सकाळी सुरतमधून गुवहाटीमध्ये पोहचल्यानंतर जाहीर केले होते. त्यानंतरपासूनच राज्यामधील सरकार अल्पमतात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच आता संजय राऊत यांनी विदानसभा बरखास्तीसंदर्भात ट्विट केलं आहे.
संजय राऊत यांनी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद सुरू असून ते परत येतील असा दावा केला होता. पण आता त्यांनी खळबळजनक ट्विट करुन मोठा ट्विस्ट आणला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे शिवसेनेची नाचक्की झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे.
जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल
एकनाथ शिंदेंसोबत आमचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. आज सकाळी देखील तासभर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना आणि ते आम्हाला सोडणं शक्य नाही. ते कट्टर शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेतच राहतील आणि संपूर्ण आयुष्य शिवसेनेतच काढतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.