ShivsenaNewsUpdate : उद्धव ठाकरे यांना आशा…एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह परत येतील ….!!

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ते पुनरागमन करतील’ अशी आशा व्यक्त केली आहे. आमदारांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुरू आहे, मी त्यांच्याशी बोललो आहे. ते परत येतील. राष्ट्रवादीही आमच्यासोबत आहे.
एकनाथ शिंदे यांनी २१ आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. त्यांचे मन वळविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्याशी सुमारे दहा मिनिटे चर्चा केली. त्याचवेळी भाजप महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान आमदारांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आता भाजपसोबत जावे असे काहीजण म्हणत आहेत. आपण एकत्र कसे जाऊ? त्यांच्यासोबत जाऊन आम्ही यापूर्वीही त्रास सहन केला आहे. आता त्यांच्यासोबत कशाला जायचे?’
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , ‘एकनाथ शिंदे यांची गरज काय आहे, हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तो परत येईल, मला खात्री आहे. लवकरच सर्व आमदार आमच्यासोबत असतील. राष्ट्रवादी आणि काँग्रेसही आमच्यासोबत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेत परतण्याची अट ठेवली आहे. शिंदे यांची उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशीही चर्चा झाली आहे. पक्षाच्या भल्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे तर उद्धव ठाकरेंनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करून मुंबईला परत येण्यास शिंदे यांना सांगितले आहे.