BJPNewsUpdate : मिशन -२६ वर भाजपचे लक्ष , राज्यातील जागा जिंकण्याची रणनीती …

मुंबई : निवडणुकीत राज्यातील ४८ च्या ४८ जागा जिंकण्याचा संकल्प भाजपने केला असल्याची माहिती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात लोकसभेच्या सध्या ४८ जागा आहेत. यापैकी भाजपचे सर्वाधिक २२ खासदार आहेत. भाजप आज ज्या २२ जागांवर सत्तेत आहे त्या जागांवर पुन्हा निवडून येण्याची भाजपला खात्री आहे. त्यामुळे ज्या २६ जागांवर भाजपचे खासदार नाहीत किंवा पराभव झालेला आहे त्या ठिकाणी अधिक लक्ष देण्यासाठी भाजपने ‘मिशन २६’ सुरु केले आहे.
राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आतापासून तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत आगामी १८ महिन्यांमधील पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली, तसेच महाराष्ट्राच्या जागांच्या संदर्भात एक समिती देखील तयार करण्यात आली असून, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना तिच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत माध्यमांना या संदर्भात सविस्तर माहिती दिली.
राज्यातील सर्व ४८ मतदारसंघात आम्ही ताकदीने जिकू…
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले “भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडल्या आहेत. आम्ही राज्यात एक समिती नेमली आहे त्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली असून पुढच्या १८ महिन्यात काय करायचे हे नियोजन आखले आहे. फक्त निवडणुकीपुरते नाही तर सातत्याने आमचे लोक, जी आम्ही जिकलो त्यावर तर आमचे लक्ष आहे पण जे नव्याने जिंकायचे त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहेत. राज्यातील सर्व ४८ मतदारसंघात आम्ही ताकदीने जिकू”.
फडणवीस पुढे म्हणाले कि , “जे मतदारसंघ आम्ही जिंकलो आहोत, त्यावर तर आम्ही लक्ष देतोच आहोत. परंतु आपल्याला नव्याने जे जिंकायचे आहेत, असे देखील काही मतदारसंघ आम्ही निवडले आहेत आणि आज निवडलेल्या १६ मतदारसंघाच्या व्यतिरिक्त आठ मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. ४८ मतदारसंघात आम्ही ताकदीने लढू, या अगोदर आम्ही दाखवलेलं आहे. ४२ मतदारसंघ जिंकण हे काही सोपं काम नाही, ते आम्ही जिंकलेलो आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की ४८ मतदारसंघात आमची तयारी असणार आहे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू.”
देशात भाजपची ताकद अधिक वाढावी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, प्रल्हाद पटेल अशा अनेक मंत्र्यांना कामे देण्यात आले आहेत. जसे आता महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना केरळ, तामिळनाडूतही काम देण्यात आले आहे. त्यामुळे देशभरातील मतदारसंघात सगळे मंत्री जाणार आहेत.” अशी देखील माहिती यावेळी फडणवीसांनी दिली.