IndiaNewsUpdate : अग्निपथ योजनेवरून तरुणांचा संताप, बिहारमध्ये रास्ता रोको , जाळपोळ

पाटणा : मोदी सरकारने ४ वर्षासाठी सुरु केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध दर्शवित बिहारमधील अनेक शहरांमध्ये तरुणांनी रस्त्यावर उतरून या योजनेचा निषेध केला. चार वर्षानंतर सरकार केवळ २५ टक्के लोकांना सेवेत कायम ठेवत ७५ टक्के तरुणांना सेवेतून कमी केल्यानंतर या तरुणांनी करायचे काय ? असा प्रश्न या आंदोलक विद्यार्थ्यांनी विचारला आहे.
बक्सरमध्ये सैन्यात जाण्यासाठी तयारीत असलेले विद्यार्थी या योजनेमुळे भडकले असून त्यांनी रेल्वे ट्रॅक अडवला अडवल्याने दिल्ली-हावडा मार्गावरील जनशताब्दी एक्स्प्रेस बक्सरमध्येच थांबवली आहे परिणामी प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी मुझफ्फरपूरमध्ये आंदोलक तरुणांनी राष्ट्रीय महामार्ग 28 रोखून धरला तर रेल्वे स्थानकाजवळील चक्कर चौकात तरुणांनी जाळपोळ करून रास्ता रोको केला. येथून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर चक्कर मैदान आहे, तेथे लष्कराची भरती चालू आहे.
दरम्यान तरुणांचे हे आंदोलन लक्षात घेऊन बक्सर आणि मुझफ्फरनगरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. सोबतच पोलीस आणि प्रशासन आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या तरुणांच्या रास्ता रोकोमुळे मुझफ्फरपूर समस्तीपूर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.
काय आहे अग्निपथ योजना
केंद्र सरकारने सैन्य भरतीसंदर्भात एक नवीन योजना सुरू केली आहे. देशसेवा करणाऱ्या तरुणांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत ४ वर्षांसाठी देशातील तरुणांची सैन्यात भरती होणार आहे. यासोबतच योजनेत अल्प मुदतीच्या सेवेसाठी तरुणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे राजनाथ सिंह म्हणाले होते.
नवीन योजनेत काय समाविष्ट आहे
या योजनेत ४ वर्षांनंतर सैनिकांचा आढावा घेतला जाणार आहे.
सैनिकांना नोकरी सोडताना सेवा निधी पॅकेज मिळेल.
या योजनेत पेन्शन नसून एकरकमी पैसे दिले जातील.
या सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकांना अग्निवीर म्हटले जाईल.
या योजनेंतर्गत भरती झालेल्या बहुतांश जवानांची चार वर्षांनी सुटका होणार आहे.
पगार किती मिळेल
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या योजनेत तरुणांना पहिल्या वर्षासाठी ४.७६ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळेल. त्याच वेळी, गेल्या म्हणजेच चौथ्या वर्षात ती वाढून ६.९२ लाख होईल. त्याचबरोबर सैन्यातील लोकांनाही जोखीम आणि कष्टासह भत्त्यांचा लाभ मिळणार आहे. सोबतच सेवेची ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लष्करातील तरुणांना ११.७ लाख रुपये सेवा निधी म्हणून देण्यात येणार आहेत. कृपया लक्षात घ्या की या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही.