MaharashtraNewsUpdate : मोदींनी सांगितले संतवचन पण अजित पवारांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादीच्या संतप्त प्रतिक्रिया…

पुणे : आपल्या देहूच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात संत वचनांची उजळणी करीत जगद्गुरू संत तुकोबारायांना अभिवादन केले खरे पण याच कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना कार्यक्रमात बोलण्याची संधी न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने यावर टीका केली आहे . विशेष म्हणजे भाजपनेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र उपस्थितांना संबोधित केले . हा राज्याचा अवमान असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
आज देहू येथे पंतप्रधानांच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला . त्यानंतर पंतप्रधान मोदी वारकऱ्यांशी संवाद साधला. मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आले होते. त्यानिमित्ताने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी संत तुकाराम महाराज देवस्थानाने केली होती. पंतप्रधानांचा सत्कार करण्यासाठी उपरणे, पगडी, टाळ, चिपळ्या, तुळशीची माळ आणि वीणा भेट देऊन करण्यात आला. श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थित वारकरी संप्रदायास संबोधित केले.
संतांचे अभंग हे सातत्याने आपल्यास प्रेरणा देतात…
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी सादर करीत सांगितले कि, भारत हा संतांची भूमी असलेला देश आहे, संतांची शिकवणच आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहे. संतांचे अभंग हे सातत्याने आपल्यास प्रेरणा देतात. समाजात उच-नीच काही नाही अशी भागवत शिकवण संत तुकाराम महाराजांनी आम्हाला दिली. भागवत भक्तीसाठी दिलेला त्यांचा हा मूलमंत्र राष्ट्रभक्ती आणि समाजभक्तीसाठीही लागू आहे. वारीत महिला भगिंनी मोठ्या आनंदाने सहभागी होतात, असे म्हणत देश महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचेही मोदींनी म्हटले.
शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची महत्वाची भूमिका
दरम्यान तुकोबारायांची शिळा ही भक्ती आणि आधाराचे केंद्र असल्याचे सांगून मोदी म्हणाले कि , संत तुकाराम महाराज यांचे अभंग अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक आहेत. संतांच्या कार्यातून नित्य ऊर्जा मिळत राहते. शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येणे मिळणे हे माझे भाग्य आहे. जो भंग होत नाही तो अभंग. शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका आहे. संताची उर्जा समजाला गती देण्याचे काम करते. तसेच देशभक्तीसाठी तुकोबांचे अभंग महत्त्वाचे आहेत. जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ही शिकवण आपल्याला संत तुकारामांनी दिली. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणं, त्यांचं कल्याण हीच शिकवण आपल्याला संतांनी दिली.
अजित पवारांना भाषणाची संधी नाही…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणच करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी व्यासपीठावर उपस्थितीत असलेल्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे या तिघांची भाषणे झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव भाषणासाठी न पुकारल्यामुळे आता कार्यक्रमाच्या संयोजक समितीवर टीका होते आहे.
दरम्यान कार्यक्रम सुरू असताना भाषणासाठी अजित पवार यांचे नाव न घेता संयोजकांनी थेट नरेंद्र मोदी यांचं नाव घेतल्यानंतर खुद्द मोदी यांनीही अजित पवार यांच्याकडे हात दाखवून भाषणासाठी विचारणा केली. मात्र आपण भाषण करा असे अजित पवार यांनी सुचवल्याचे दिसत होते.
हा महाराष्ट्राचा अपमान – सुप्रिया सुळे
यावर आपली प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या कि , “या कार्यक्रमामध्ये अजित पवारांचे भाषण व्हावे यासाठी प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती करण्यात आली होती. पण पंतप्रधान कार्यालयाने विनंती स्वीकारली नाही. पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर अन्याय करण्यात आला आहे. आमच्या राज्याचा आमचा नेता व्यासपीठावर आहे. तिथे विरोधी पक्षनेत्यांना भाषण करु देता पण आमच्या नेत्यांना भाषण करु देत नाहीत. ही दडपशाही असून आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम केले आहे.
प्रोटोकॉलनुसारच अजित पवारांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती, असे सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या कि , शेवटी देवेंद्र फडणवीस यांना संधी द्यायची की नाही हा पंतप्रधान कार्यालयाचा प्रश्न आहे. जर विरोधी पक्षनेत्यांना संधी दिली जात असेल आणि अजित पवार यांना संधी दिली जात नसेल तर ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. हा महाराष्ट्राचा आणि पुण्याचा अपमान आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहे. पण ते आधी राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. इतक्या कोत्या मनाचे केंद्रातील सत्ताधारी असतील हे पहिल्यांदाच राजकारणात दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधानांवर उधळली स्तुतीसुमने
यावेळी व्यासपीठावरून आपले मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. आपले पंतप्रधान हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, असे सांगत फडणवीस म्हणाले कि , संत तुकारामांनी जो मार्ग दाखवला होता त्या मार्गावर चालण्याचे काम आपले पंतप्रधान करत आहेत. ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ हाच मंत्र पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारला आणि गरीब कल्याणाची मोहीम हाती घेत रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत. म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे.
आपले पंतप्रधान ‘प्रधानसेवक’ आहेत. त्यामुळे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हेच तर वारकरी संप्रदाय सर्वांना सांगतो. तेच काम मोदी करत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण जगासाठी जे पसायदान मागितले , संपूर्ण जग आपले आहे, हा संदेश दिला. नरेंद्र मोदी यांनी देखील करोना काळात संपूर्ण जगाला लसीकरणाचा पुरवठा केला. मोदी यांनी खऱ्या अर्थाने भागवत धर्माचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवत आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.