MaharashtraNewsUpdate : पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकच मंचावर, अजित पवार यांना सोबत घेऊन मोदींनी गाठली मुंबई……

मुंबई : अनेक महिन्यांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत एकत्र दोन कार्यक्रमात सहभागी होत आहेत. कुलाबा येथील आयएनएस शिकारा नौदल हेलीपोर्टवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. तेथून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पहिल्या कार्यक्रमासाठी राजभवनात गेले, आणि व्यासपीठावर आपली हजेरी लावली.
दरम्यान देहू येथील कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुंबईकडे रवाना झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी अजित पवार यांना आपल्या हेलिकॉप्टरमध्ये सोबत घेतले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर होते. साधारणपणे तासाभराचा हा प्रवास झाला. या प्रवासात काय चर्चा झाली, याची तपशील समोर येऊ शकली नाही.
पंतप्रधान मोदी जेव्हा मुंबईत पोहोचले, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रोटोकॉल नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘जलभूषण ‘इमारतीचे उद्घाटन, द्वारपूजन झाल्यानंतर राजभवनातील ऐतिहासिक श्रीगुंडी मंदिराला पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख,पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह निमंत्रित दरबार हॉल येथे उपस्थित होते.
आजच्या मुंबई दौऱ्यात पंतप्रधानांनी राजभवन येथे जलभूषण भवन आणि क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन केले. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ‘मुंबई समाचार’च्या २०० व्या वर्धापन दिनाच्या समारंभात ते सहभागींना संबोधित करतील. तसेच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ला भेट देतील, या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री पंतप्रधानांसोबत उपस्थित आहेत.
दरम्यान या कार्यक्रमामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे. बीकेसी येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नवी दिल्लीला रवाना होतील.
२५ एप्रिल रोजी, पंतप्रधान मोदींना पहिला लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेंव्हा मात्र मुख्यमंत्री अनुपस्थित होते. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत दुसऱ्या आपल्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना स्वागत करणे ही प्रोटोकॉलची बाब असून महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही ठीक असल्याचे दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे.
दरम्यान देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण न करू दिल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे, नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे अजित पवार यांना आपल्या हेलिकॉप्टरमध्ये एकत्र घेऊन मुंबईला गेल्याचेही चर्चा आहे.