IndiaNewsUpdate : प्रेषित मुहम्मद पैगंबर विवाद : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या दिवशीही आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक, ममता भडकल्या …

कोलकाता : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या निलंबित नेत्यांच्या वक्तव्यावरून पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या दिवशीही निदर्शने सुरूच आहेत. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली, या वादावरून उसळलेल्या हिंसाचारावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच भडकल्या . काही राजकीय पक्षांना दंगल भडकवायची आहे. भाजपचे ‘पाप’ सर्वसामान्यांनी का भोगावे ,असा सवालही उपस्थित करून त्या म्हणाल्या कि , यामागे काही राजकीय पक्ष आहेत ज्यांना दंगल भडकावायची आहे. पण ते खपवून घेतले जाणार नाही. दंगेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल.
कोलकात्याजवळील हावडा येथे भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याविरोधातील निदर्शने शुक्रवारी हिंसक झाली. त्याचवेळी, शनिवारी सकाळी याच परिसरात आणखी एक हाणामारी झाली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. प्रशासनाने बुधवारपर्यंत परिसरात संचारबंदीचे आदेश लागू केले असून सोमवारपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात इंटरनेट बंद ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नुपूर शर्मा आणि जिंदाल यांना अटक करा , तिकडे दिल्लीत आंदोलन करा
याआधी गुरुवारी हावडा येथे आंदोलकांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यात आंदोलन करण्याऐवजी नवी दिल्लीत जाऊन गोंधळ घालण्यास सांगितले. सीएम ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले की, नुपूर शर्मा आणि आता हकालपट्टी केलेले भाजप नेते नवीन कुमार जिंदाल यांच्या टिप्पण्यांमुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन झाली आहे आणि त्यांना अटक झाली पाहिजे.
शुक्रवारच्या नमाजानंतर नऊ राज्यांतून जोरदार निदर्शने झाल्याचे वृत्त आहे. झारखंडच्या रांचीमध्ये दोन जण ठार झाले, तर पोलिसांसोबत आंदोलकांच्या चकमकीत एका पोलिसासह २४ जण जखमी झाले. त्याच वेळी, उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये चकमकीही झाल्या, या संदर्भात २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आतापर्यंत देशातील अनेक भागांत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.