UttarPradeshNewsUpdate : प्रेषित मोहम्मद पैगंबर विवाद : भाजप नेत्याला युपी पोलिसांकडून अटक

कानपूर : प्रेषित मोहम्मद यांच्यावर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेत्याला यूपी पोलिसांनी अटक केली आहे. कानपूरमधील हिंसाचारानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हर्षित श्रीवास्तव असे या भाजप नेत्याचे नाव आहे. सोशल मीडियावर भडकावणारी पोस्ट टाकल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हर्षित हा युवा मोर्चाचा माजी जिल्हा मंत्री आहे. जो कोणी धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करेल, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, असे कानपूरचे पोलीस आयुक्त विजय मीना यांनी म्हटले आहे.
भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा वाद अजूनही सुरूच आहे. इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, इराण, UAE, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया आणि इंडोनेशियासह किमान 15 देशांनी या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भारताविरुद्ध अधिकृत निषेध नोंदवला आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे, तर पक्षाच्या दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे कानपूर हिंसाचारानंतर यूपी सरकारने मोठे पाऊल उचलत २१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. दुसरीकडे, कानपूरच्या डीएम नेहा शर्मा यांचीही बदली करण्यात आली आहे. आता येथील नवीन डीएम विशाख जी असतील. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्याने केलेल्या वादग्रस्त आणि कथित ‘अपमानास्पद’ वक्तव्याच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारी हिंसाचार उसळला. या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शुक्रवारच्या नमाजनंतर दुकाने बंद ठेवत असताना दोन समुदायांच्या लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. ते शांत करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 30 हून अधिक जणांना अटक केली आहे.