MaharashtraPoliticalUpdate : संभाजी राजेंच्या निमित्ताने बहुजन मतांचे विभाजन, भाजपची खेळी : श्रीमंत छ्त्रपती शाहू महाराज

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष उमेदवार म्हणून उभे करणे आणि बहुजन मतांचे विभाजन करणे हि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी असल्याचा आरोप संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केला आहे .
कोल्हापुरात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हा खुलासा केला असल्याचे वृत्त ऑनलाईन लोकमतने दिले आहे. संभाजीराजेंना शिवसेनेने उमेदवारी दिली नाही त्यामुळे छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला. त्यावर बोलताना शाहू महाराज म्हणाले कि , छत्रपती घराण्याचा अपमान असे म्हणता येणार नाही. ही पूर्णपणे संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची खेळी होती. संभाजीराजेंनी अपक्ष लढावे यासाठी भाजपाने त्यांना भाग पाडले असे त्यांनी सांगितले.
संभाजी राजे यांचे सर्व निर्णय वैयक्तिक
श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढली. त्यामुळे स्वत:च्या बळावर पुढे जाणे किंवा इतर पक्षाचा पाठिंबा घेणे हे दोन पर्याय संभाजीराजेंकडे होते. मागील वेळी राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेतानाही आम्ही त्यांना ती घेऊ नये असे मत मांडले होते. परंतु त्यांनी त्यासंबंधी तो वैयक्तिक निर्णय घेतला. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी राजकीय जी पाऊले उचलली आहेत. त्यात कुठेही आमच्याशी अथवा घरच्यांशी चर्चा केली नाही. यात छत्रपती घराणं कुठे येत नाही. त्यामुळे हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असे म्हणता येणार नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.
दरम्यान संजय पवार यांचे शिवसेनेकडून नाव जाहीर होताच स्वत: छत्रपती शाहू महाराजांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. संजय पवार यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, जो अनेक वर्ष पक्षासाठी झटत होते त्यांना संधी देण्याचे काम शिवसेनेने केले त्याचा आनंद असल्याचं मतही छत्रपती शाहूंनी व्यक्त केले. तसेच शिवसेनेने दिलेला शब्द फिरवला असेही म्हणता येत नाही असे त्यांनी म्हटले .
संभाजीराजेंनी ‘अपक्ष’ लढावं ही तर फडणवीसांची खेळी
दरम्यान, संभाजीराजेंनी २०१६ मध्ये राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्यासाठीही आमचा विरोध होता. २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यानंतरची वाटचाल ही व्यक्तिगत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला वैयक्तिक जगण्याचा अधिकार आहे. मला किंवा छत्रपती घराण्याला कुठलाही निर्णय त्यांनी विचारून घेतला नाही. मी कधीही त्यांना विरोध केला नाही. आतापर्यंत जे निर्णय घेतले ते व्यक्तिगत आहेत. राजकीय संघटना काढून त्यांना पुढे जायचे असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत. पक्ष स्थापन केला असेल तर त्यांना राजकारण जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांना खासदारकी हवी होती असं शाहू छत्रपती यांनी सांगितले.
संजय राऊत आज कोल्हापुरात
शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत आज कोल्हापुरात आहेत. आपल्या दौऱ्यात त्यांनी भपवर टीका केली. ते म्हणाले कि , चंद्रकांत पाटील काही शिवाजी महाराजांचे वंशज नाहीत. आम्हाला बोलायला लावू नका. शिवाजी महाराज सर्वांचे आहेत कोणाची मक्तेदारी नाही. जो काही विषय आहे तो संभाजी राजे आणि आमच्यातला विषय आहे. चोमडेपणा करू नये. त्यांना फारच काही वाटत असेल तर त्यांनी आणि काँग्रेसने संभाजी राजे यांना त्यांची ४२ मते द्यावीत. हा विषय आता आमच्यासाठी संपला आहे.