IndiaNewsUpdate : यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेप , श्रीनगरमध्ये तणाव , इंटरनेट बंद

नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरतावादी यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र, दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या काश्मिरी फुटीरतावादी नेत्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयात केली होती. मलिकला कलम १२१ अन्वये जन्मठेपेची तसेच UAPA च्या कलम १७ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन्ही शिक्षा एकाचवेळी सुनावण्यात येतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने या फुटीरतावादी नेत्याला 10 लाख 70 हजारांचा दंडही ठोठावला आहे.19 मे रोजी एनआयए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी मलिकला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत आरोपांवर दोषी ठरवले.
दरम्यान यासिनला शिक्षा सुनावल्याची बातमी समजताच श्रीनगरमधील मैसुमा भागात यासीन मलिक समर्थक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यासीनच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. खबरदारी म्हणून सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. खबरदारी म्हणून सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या सर्व घटनांदरम्यान प्रशासनाने श्रीनगरमध्ये तत्काळ प्रभावाने इंटरनेट सेवा बंद केली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर शहरही बंद करण्यात आले आहे.
#WATCH | Terror funding case: Yasin Malik being taken out of NIA Court in Delhi. He will be taken to Tihar Jail shortly.
He has been awarded life imprisonment in the matter. pic.twitter.com/bCq5oo47Is
— ANI (@ANI) May 25, 2022
पटियाला हाऊसच्या विशेष न्यायाधीशांनी एनआयए अधिकाऱ्यांना त्याच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले होते जेणेकरून दंडाची रक्कम निश्चित करता येईल. यापूर्वी 10 मे रोजी मलिक यांनी न्यायालयाला सांगितले होते की, मला आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना सामोरे जायचे नाही. त्याने आपला गुन्हा कबूल केला होता. मलिक सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे.
दरम्यान, यासिन मलिकच्या शिक्षेवर न्यायालयाच्या निर्णयापूर्वी बुधवारी श्रीनगरमधील काही भाग बंद ठेवण्यात आला होता. बहुतेक दुकाने आणि व्यापारी आस्थापने मैसुमा आणि लगतच्या भागात बंद राहिली, त्यात लाल चौकातील काहींचा समावेश होता. जुन्या शहरातील काही भागात दुकाने बंद राहिली, परंतु सार्वजनिक वाहतूक सामान्य राहिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
दोषींमध्ये यांचाही समावेश
न्यायालयाने यापूर्वी फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसुफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, फरार अहमद शाह, फरार अहमद शाह यांना अटक केली होती. शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
असा आहे यासिन मलिक याचा प्रवास…
यासिन मलिकचा जन्म 3 एप्रिल 1966 रोजी श्रीनगरमधील मैसुमा येथे झाला. यासीनचे वडील गुलाम कादिर मलिक हे सरकारी बस चालक होते. यासीनचे संपूर्ण शिक्षण श्रीनगरमध्ये झाले. त्याने श्री प्रताप महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. यासीन मलिकने जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख बनण्यापर्यंतची गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. त्यात त्याने दावा केला होता की, काश्मीरमध्ये लष्कराचे अत्याचार पाहून आपण शस्त्र उचलले. यासीनने 80 च्या दशकात ‘ताला पार्टी’ स्थापन केली होती, ज्याद्वारे त्याने काश्मीर खोऱ्यात अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या.
1986 मध्ये मलिकने ‘ताला पार्टी’चे नाव बदलून ‘इस्लामिक स्टुडंट्स लीग’ (ISL) केले. यामध्ये तो फक्त काश्मीरमधील तरुणांचा समावेश करायचा. काश्मीरला भारतापासून वेगळे करणे हा त्याचा उद्देश होता. काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून आणणाऱ्या अशफाक मजीद वानी, जावेद मीर आणि अब्दुल हमीद शेख या दहशतवाद्यांचा आयएसएलमध्ये समावेश होता.
1988 मध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) मध्ये सामील झाल्यानंतर काही दिवसांनी तो पाकिस्तानला गेला. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर 1989 मध्ये भारतात परतला. यानंतर त्याने गैर-मुस्लिमांना मारण्यास सुरुवात केली. 8 डिसेंबर 1989 रोजी देशाचे तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण करण्यात आले होते.