SambhajiRajeLatestUpdate : काट्याने काटा काढत शिवसेनेकडून विषय संपला, कोल्हापूरलाच दिली उमेदवारी

मुंबई : छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली शिव बंधनाची ऑफरला कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर शिवसेनेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय संपवला आहे . विशेष म्हणजे या जागेसाठी औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव काल पर्यंत जवळ जवळ निश्चित होते परंतु काट्याने काटा काढत बहुचर्चित सहाव्या जागेचे तिकीट शिवसेनेने कोल्हापूरलाच दिले असल्याचे वृत्त आहे. याची अधिकृत घोषणा तेवढी बाकी असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान शिवसेना छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी देणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली मात्र अद्याप अधिकृत घोषणा करणे तेवढे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मावळे असल्यानेच राजे असतात असे म्हणताना त्यांनी अप्रत्यक्षपणे संभाजीराजेंना टोलाही लगावला.
संभाजीराजेंच्या समर्थकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले कि, “आम्ही कोणाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही. त्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती नसावा. एकनाथ ठाकूर हे कडवट शिवसैनिक होते. ज्या सामनाच्या इमारतीखाली आपण बोलत आहोत त्यातही त्यांचा वाटा होता. प्रियंका चतुर्वेदीदेखील शिवसेनेच्याच उमेदवार आहेत. प्रितीश नंदी हेदेखील शिवसेनेचे उमेदवार होते”.
“यापूर्वीसुद्धा वरिष्ठ शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शाहू महाराजसुद्धा पक्षाच्या तिकीटावर लोकसभा लढले आहेत. मालोजीराव भोसले हेदेखील पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी घेऊन लढले आहेत. स्वत: संभाजीराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापुरातून निवडणूक लढले आहेत. त्यामुळे राजांना, महाराजांना पक्षाचं वावडं असू नये. देशभरातील अनेक राजघराण्याचे लोक आजही अनेक पक्षांच्या तिकीटावर राज्यसभेत, लोकसभेत आले आहेत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
कोण आहेत संजय पवार ?
दरम्यान संजय पवार यांच्याविषयी माहिती देताना संजय राऊत म्हणाले कि , संजय पवार शिवसेनेचे मावळे असून उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत आणि या दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि विजयी होईल. कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्के मावळे असून मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्षनेते, पदाधिकारी हे मावळ्यांच्या जोरावर उभे असतात.
दरम्यान, राज्यसभेसाठी आपल्या नावाचा विचार होत असल्याचे बातमी कळाली. मनाला अतिशय आनंद झाला. सामान्य शिवसैनिकाला एवढे मोठे पद देण्याचा विचार होत असल्याने पक्षाविषयी असलेला आदर आणखी वाढला आहे, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले पवार हे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित आहेत. ३३ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. एकदा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना संधी मिळाली. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा नगरसेवक अशी त्यांची महापालिकेत ओळख होती. यामुळे पवार हे तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले. शहराच्या सर्वच प्रश्नावर आंदोलन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे. त्यामुळे लढाऊ कार्यकर्ता, कट्टर शिवसैनिक अशी पवारांची कायमची ओळख. भाजप, काँग्रेसने अनेकदा त्यांना आमिष दाखवत पक्षात घेण्याचा प्रयत्न केला, पण शिवसैनिक ही ओळख कायम ठेवण्यातच पवारांनी आनंद मानला.
संजय पवारांचे नाव गेले २० वर्षे कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून घेतले जाते. पण प्रत्यक्षात त्यांना संधी मिळाली नाही. सुरेश साळोखे आणि राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आणि ते दोन दोन वेळा निवडूनही आले. यामुळे पवारांना आमदार होता आलं नाही. करवीर तालुका प्रमुख, चार वर्षे शहरप्रमुखपदी काम केलेले पवार गेली १४ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. युतीचे सरकार असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्षपदीही त्यांना संधी मिळाली. राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे हे पद होते. पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांचे हे पद गेले.