SambhajiRajeLatestNewsUpdate : तिकीट आणि छत्रपती घराण्याचा सन्मान याचा संबंध नाही , भाजपने स्पष्ट केली भूमिका

मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांनी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने भाजपने स्पष्ट शब्दात आपले मत मांडले आहे. याबाबत बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे कि , राज्यसभा उमेदवारीचे तिकीट आणि छत्रपती घराण्याचा सन्मान या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडणे गैर आहे.
छत्रपती घराण्याला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात सन्मान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती छत्रपती घराण्याचा सन्मान करते, परंतु संभाजीराजे यांच्या उमेदवारीचे तिकीट आणि छत्रपतींचा सन्मान या गोष्टी जोडायची गरज नाही. तिकीट हा वेगळा भाग आहे. कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तीच्या मनात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याविषयी प्रेमच आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्यावर ठाम आहे तर शिवसेनेचा प्रस्ताव संभाजीराजे यांनी न स्वीकारल्यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी पर्यायी उमेदवाराची निवड केल्याची चर्चा आहे. हे समजताच संभाजीराजे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील : संभाजीराजे
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. आमच्यात बोलणे झाले आहे. पुढे काय करायचे तेदेखील ठरले आहे. उद्धव ठाकरे त्याप्रमाणेच वागतील, असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
सहाव्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार : संजय राऊत
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना संभाजीराजे छत्रपती यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा मान राखू. त्यामुळेच आम्ही संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. सध्यातरी यावर मी एवढंच बोलू शकेन. पण राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असेल, ही भूमिका संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे किंवा कोल्हापूरातील जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित केल्याची माहिती आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्यास संभाजीराजे छत्रपती यांचे निवडून येणे अवघड आहे.
दरम्यान मुंबईत पोहोचल्यानंतर संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुन्हा भेट घेणार का ? असा प्रश्न आहे. दरम्यान संभाजीराजे यांना राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पाठिंबा हवा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी अट उद्धव ठाकरे यांनी आधीच घातली आहे. त्यासाठी संभाजीराजे यांना सोमवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर शिवबंधन बांधण्यासाठी या, असेही सांगण्यात आले होते. मात्र, संभाजीराजे छत्रपती हा प्रस्ताव नाकारून मुंबईतून कोल्हापूरला निघून आले होते. त्यामुळे संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.