PuneNewsUpdate : बहुचर्चित शरद पवार यांच्या ब्राह्मण समाजाच्या बैठकीचे काय झाले ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात होते. आपल्या पुणे दौऱ्यात त्यांनी ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून त्यांच्याशी संबंधित विषयावर चर्चा केली. या बैठकीमागची पार्श्वभूमी सांगताना पत्रकार परिषदेत पवार यांनी सांगितले कि , दवे नावाच्या व्यक्तीचा भेटीसाठी फोन आला होता इतरही काही लोकांना भेटायचे होते म्हणून त्यांच्याशी एकत्र चर्चा करावी या हेतूने हि बैठक झाली. “माझ्याकडे पहिल्यांदाच ब्राह्मण समाजाच्या संघटनांकडून भेटीची मागणी करण्यात आली. त्यामुळे त्यांचे म्हणणे काय आहे हे समजून घेण्यासाठी मी ही बैठक घेतली,” असेही पवारांनी नमूद केले.
या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी, ब्राह्मण समाजाच्या तीन मागण्या होत्या, त्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगून राज्यातील वातावरण, अमोल मिटकरी, पेट्रोल डिझेल दरवाढ, राज ठाकरेंची सभा, देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक या प्रकरणावर भाष्य केले.
आजच्या आपल्या पुणे दौऱ्यात शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांच्या ४० प्रतिनिधींसोबत संवाद साधला. आमच्या पक्षातील एक दोन नेत्यांच्या वक्तव्यांवर त्यांचा आक्षेप होता. मी त्यांना आमच्या सहकाऱ्यांना जात धर्माविरोधात वक्तव्य करु नये, ही बाब आजच मी त्यांना बैठकीत सांगितली आहे. अलीकडील काळात ग्रामीण भागातील वर्ग नागरी भागात जादा प्रमाणात येत आहे. साहजिकच सेवा क्षेत्रात अधिक संधी मिळण्याची हमी हवी, अशी मागणी त्यांनी केली.
केंद्र आणि राज्याची आकडेवारी आम्ही गोळा केली होती. सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये त्यांचं प्रमाण अधिक असल्याने त्यांची आरक्षणाची मागणी मान्य करता येणार नाही,असे सांगितले . त्यानंतर त्यांनी आरक्षण कुणालाच नको, अशी भूमिका घेतली होती. मात्र, मी त्यांना असे करता येणार नाही, असे सांगितलं. या देशातील दलित, आदिवासी यांना आरक्षण द्यावे लागेल. हा वर्ग मागे राहिलेला आहे, तो इतरांच्या बरोबरीला येईपर्यंत आरक्षणाला विरोध करु नये असे मी त्यांना सांगितले.
परशुराम महामंडळ स्थापन करण्याची मागणी
इतर समाजासाठी असलेल्या महामंडळाप्रमाणे ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ स्थापन करावे , अशी त्यांची मागणी होती. मी त्यांना मी सध्या पदावर नाही, मात्र मुख्यमंत्र्याशी तुमची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेन. त्यांच्या चार पाच प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांची चर्चा होईल, असे त्यांना सांगितले आहे, असे पवार म्हणाले.
शरद पवारांनी समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते, दादोजी कोंडदेव हे देखील शिवरायांचे गुरू नव्हते असे म्हटले होते. तसेच त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळेही ब्राह्मण समाज त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाविषयी वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. तसेच समाजा-समाजामध्ये दरी निर्माण होत होती. त्याच धरतीवर शरद पवारांनी राज्यभरातील ब्राह्मण समाजातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला.
बैठकीला यांची उपस्थिती होती
या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते . राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून ब्राम्हण समाजाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबतची नाराजी शरद पवारांकडे मांडण्यात आल्याचे समजते तर दुसरीकडे शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणाऱ्या मतांबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली आहे.
या बैठकीला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, जागतिक ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष अजित घाटपांडे, समस्त ब्राम्हण समाजाचे काकासाहेब कुलकर्णी, चित्पावन ब्राम्हण संघाचे अध्यक्ष गाडगीळ गुरुजी, आम्ही सारे ब्राम्हण संघटनेचे भालचंद्र कुलकर्णी, ब्राम्हण महासभेचे प्रकाश दाते , समर्थ मराठी संस्थेचे अनिल गोरे , ॲमोनोरा टाऊनशी आणि सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे आदींची उपस्थिती होती.