KetakiChitalEnewsUpdate : केतकी चितळे १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत , १० पोलीस ठाण्यात गुन्हे …

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात केतकीला अटक केल्यानंतर तिची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तिची तब्बल १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सिने अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर टाकल्यानंतर त्यावर सर्व स्तरातून आणि पक्षांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणात तिच्याविरुद्ध राज्यात १० विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीला रविवारी दुपारी ठाणे गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर तिची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान आज तिची कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
केतकीच्या अटकेची इतर पोलीस ठाण्यांना प्रतीक्षा
केतकी चितळे विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे अनेक पोलीस थांच्या पोलीस तिला अटक करण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. आज केतकीची पोलीस कोठडी संपल्यानंतर देहूरोड पोलीस तिचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात हजर होते. मात्र, त्याआधीच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिच्या कस्टडीची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांआधी गोरेगाव पोलीस तिच्या अटकेसाठी तयार होते. त्यामुळे आधी गोरेगाव, नंतर पिंपरी चिंचवड आणि त्यानंतर देहूरोड पोलिसांकडून आता केतकी चितळेला अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे केतकीने तिच्या या वादग्रस्त पोस्टमध्ये ‘तुका म्हणे’, या शब्दांचा वापर केल्यामुळे संत तुकाराम महाराज संस्थाननेही तिच्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खोत – तृप्ती देसाईंकडून चितळेचे समर्थन
दरम्यान, केंटकीविरुद्ध सर्वत्र टीका होत असताना रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी केतकीने न्यायालयात स्वत:ची बाजू स्वत: मांडल्याचे सांगत याबद्दल तिला मानले पाहिजे, असे म्हटल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्याचवेळी तृप्ती देसाई यांनी देखील केतकी चितळेने शरद पवारांचे नाव घेतलेले नाही असे म्हणत तिची बाजू घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर देखील टीका केली जात आहे.