MaharashtraPoliticalUpdate : काँग्रेस -राष्ट्रवादीत काय चाललंय ? नाना पटोले यांनी केले राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

नागपूर : भंडारा – गोंदियातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मदत केल्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या युती धर्मावर प्रशचिन्ह उपस्थित करीत मोठी टीका केली आहे. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. हे काम सातत्याने सुरू आहे. याची तक्रार मी चिंतन शिबिरात हायकमांडकडे केली आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली असून राज्यातील सत्तेत काँग्रेस राहणार की नाही? असा प्रश्न पटोलेंना विचारण्यात आला तेंव्हा याचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची स्वतंत्र निवडणूक लढविण्याची भूमिका असल्याचे स्पष्टीकरणही नाना पटोले यांनी दिले आहे. पटोले पुढे म्हणाले कि , काँग्रेसच्या चिंतन शिबिरात गेल्या अडीच वर्षातील राष्ट्रवादीच्या कुरघोडीचे अनेक उदाहरणं आम्ही आमच्या हायकमांड समोर मांडली. त्यांनी हे सर्व ऐकून घेतलं या संदर्भात आता पुढची रणनीती ठरवली जाईल. भाजपवर टीका करताना ते म्हणाले कि , देशाची स्थिती श्रीलंकेसारखी झाली आहे. भाजपने धर्म आणि जातीचे राजकारण केले असून येत्या 2 ॲाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार आहे.
प्रियांका गांधी यांना अध्यक्ष बनवण्याची मागणी
संघटना मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीतीची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी काँग्रेसने नवसंकल्प शिबिराचं आयोजन केलं होतं. मात्र, शिबिरात नेतृत्वाचा मुद्दा गाजला. यादरम्यान अनेक नेत्यांनी प्रियंका गांधी वाड्रा यांनाही अध्यक्ष करण्याची मागणी केली. राजकीय घडामोडी समितीत झालेल्या चर्चेदरम्यान पक्षाचे नेते आणि धार्मिक नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रियांका गांधी यांना अध्यक्ष बनवण्याची जोरदार मागणी केली. प्रमोद कृष्णम यांनी ही मागणी केली, तेव्हा या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित होत्या.
काँग्रेसच्या चिंतन शिबिरात काय झाले ?
उदयपूरमध्ये झालेल्या शिबारात काँग्रेसने २० प्रस्तावांना मंजुरी दिली. त्यात एक कुटुंब, एक तिकीट या प्रस्तावाचाही समावेश आहे. यासोबत ५० वर्षांखालील पदाधिकाऱ्यांना ५० टक्के प्रतिनिधित्व देण्याचाही प्रस्ताव आहे. काँग्रेसचे तीन दिवसांचे नवसंकल्प शिबिर रविवारी संपले. या शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रादेशिक पक्षांबाबत काँग्रेसचे विचार मांडले. प्रादेशिक पक्ष भाजपशी लढू शकत नाही. फक्त काँग्रेसमध्ये ती क्षमता आहे, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करताना पटोले म्हणाले कि , राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही भाजपला मदत करणारी राहिली आहे. फक्त आताच नव्हे गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी भाजपला मदत करण्याचे राजकारण करते आहे. राज्यात अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनविण्यात आले त्याचे उल्लंघन करण्यात येत आहे . सोनिया गांधी यांचा अपमान करण्यात येत असून आणि तो आम्ही सहन करणार नाही. एकूणच राष्ट्रवादीच्या भूमिकीची तक्रार आम्ही हायकमांड केली आहे. त्यावर हायकमांड निर्णय घेईल, असं नाना पटोले म्हणाले.
मी कुणाशीही गद्दारी केली नाही…
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावॉर आपली प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले कि , अजित पवारांचं ते वक्तव्य आहे. आपण व्यक्तिगत बोलणार नाही. पण पक्ष म्हणून आपण राष्ट्रवादीची तक्रार हायकमांड केली आहे. येत्या दिवसांत त्याचे परिणाम दिसतील, असे नाना पटोले पुन्हा म्हणाले. नाना पटोलेची पार्श्वभूमी ही देशाला माहिती आहे. नाना पटोले हा सत्तेसाठी धडपणारा नाही. जनतेसाठी आणि विचारासाठी लढणार आहे. माझ्या राजकीय पार्श्वभूमीची त्यांनी जास्त चिंता करण्याची गरज नाही. नाना पटोलेने राजीना दिला समोरून दिला. त्यांच्याशी गद्दारी करण्याचे काम कधीच केले नाही. नाना पटोलेचा इतिहास एकदम स्पष्ट आहे. जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाल माहिती आहे, असा टोला पटेले यांनी अजितदादांना लगावला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी खंजिर खुपसला, अशी गंभीर टीका नाना पटोलेंनी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथे बोलताना आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते कि , नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद आहे. नाना पटोले हे कुठल्या पक्षातून काग्रेसमध्ये ते तुम्हाला माहिती आहे. ते भाजपमधून आले. हेडलाईन मिळवण्यासाठी ते अशी वक्तव्य करतात. पण प्रत्यक्षात पक्ष आपआपल्या परिने काम असतात.
नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न अजित पवार यांना सोमवारी पत्रकारपरिषदेत विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी म्हटले की, नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही याला फार महत्त्व देत नाही. आमच्या पक्षातही काही झालं तर आम्ही शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतो. आपल्या देशाने २४ पक्ष एकत्र असलेले एनडीए सरकार पाहिले आहे. भांड्याला भांडं हे लागतच असतं. एका कुटुंबात भांड्याला भांडं लागतं तर तीन पक्षांच्या कुटुंबात भांड्याला भांडं लागणारच. तसं होऊ नये, यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. सरकार नीट चालवलं पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले.